स्मिथ, वॉर्नरचे पुनरागमन; फिंचकडेच धुरा
सिडनी : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाने आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर केला असून, अपेक्षेप्रमाणे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे पुनरागमन झाले आहे. या दोघांना वर्ल्ड कप संघात स्थान देताना जोश हेझलवूड आणि पीटर हँड्सकोम्ब यांना डच्चू देण्यात आले आहे; तर संघाची धुरा अॅरोन फिंच याच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे.
गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या दोन वन डे मालिका (भारत आणि पाकिस्तान) जिंकल्या आहेत. त्यात स्मिथ व वॉर्नरच्या पुनरागमनामुळे खेळाडूंचे मनोबल अधिक उंचावले आहे. हँड्सकोम्बला वगळण्यात आल्याने ऑसी संघ अॅलेक्स करी या एकाच यष्टिरक्षकासह इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे.
मागील सहा महिन्यांत ज्या प्रकारे संघ तयार झाला आहे, त्याचे समाधान आहे. त्यात भारत आणि पाकिस्तान या संघांविरुद्धच्या मालिका विजयाने खेळाडूंचे मनोबल उंचावलेले आहे, अशी प्रतिक्रिया निवड समितीचे प्रमुख ट्रेव्हर होन्स यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, स्मिथ आणि वॉर्नर यांचे संघात पुनरागमन झाले आहे. हे दोघेही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. आयपीएलमध्येही त्यांची कामगिरी चांगली झालेली आहे.
असा आहे संघ : अॅरॉन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, अॅलेक्स करी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, झाय रिचर्डसन, नॅथनकोल्टर नायल, जेसन बेहरेनडोर्फ, नॅथन लियॉन, अॅडम झम्पा.