जांभूळपाडा अंबा नदीत शेकडो जलचरांचा मृत्यू
पाली : रामप्रहर वृत्त
सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील अंबा नदीत बुधवारी (दि. 26) शेकडो जलचरांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. मासेमारीसाठी अज्ञाताने नदीच्या पाण्यात विषारी औषध टाकल्याने हे जलचर मृत पावले आहेत.
मासे पकडण्यासाठी सुधागड तालुक्यात काही ठिकाणी पाण्यात विषारी औषध टाकण्यात येते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. त्यामुळे माशांबरोबरच इतर जलचर व जलपर्णीलादेखील हानी पोहचते. शिवाय मानवी आरोग्यावरसुद्धा घातक परिणाम होतो. गेली अनेक वर्षे अंबा नदीमध्ये विषारी द्रव्य टाकून मासेमारी केली जात आहे. अशी मासेमारी थांबवून या लोकांवर कारवाई केली पाहिजे, असे जांभुळपाड्यातील ग्रामस्थ संदेश लोंढे यांनी सांगितले.
रात्रीच्यावेळी अज्ञाताने विषारी द्रव्य टाकल्याने येथील अंबा नदीतील असंख्य मासे मृत पावले आहेत. अशा प्रकार मासेमारी करणार्याची माहिती दिल्यास ग्रामपंचायतीला त्याच्यावर कारवाई करता येईल, असे उपसरपंच महेश गिरी म्हणाले.
नदीमध्ये विषारी द्रव्य टाकून मासेमारी करणे चुकीचे आहे. हे विषारी द्रव्यामुळे जलप्रदुषण होऊन जलचरांचा मृत्यू होतो. जलपर्णी व नागरिकांनाही धोका निर्माण होऊ शकतो. या संबंधात माहिती घेऊन कारवाई केली जाईल.
-श्रद्धा कानडे, सरपंच, जांभूळपाडा, ता. सुधागड