
अलिबाग : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने रायगड जिल्ह्यात सोशल इंजिनिअरींग सुरू केले आहे आणि ते यशस्वी होताना दिसत आहे.
रायगडमधील महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या ठिकठिकाणी होणार्या प्रचार सभांमध्ये मुस्लीम तरुण मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करू लागलेत. यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. आंबेत या बॅरिस्टर अंतुले यांच्या जन्मगावी झालेल्या शिवसेनेच्या मुस्लीम समाज मेळाव्याला जवळपास दोन हजार मुस्लीमांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे मुस्लीम समाजातील महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मुस्लीम समाजाकडे व्होट बँक म्हणून काही लोक पाहत होते, परंतु त्यांची जहागिरी संपली असल्याचा टोला अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांना या वेळी लगावला. आतापर्यंत मुस्लीम समाजाला शिवसेनेची भीती दाखवून मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले जात होते, परंतु या समाजाने आता या विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन नाविद अंतुले यांनी या वेळी केले. आमच्या वडिलांचे बोट धरून राजकारणात आले, परंतु मोठे झाल्यावर त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम तटकरे यांनी केले. आता पुन्हा त्यांचे नाव घेऊन मते मागण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही, अशा शब्दांत त्यांनी तटकरे यांना सुनावले. या वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील सुलतान मुकादम, रोह्याचे उस्मान रोहेकर, महाडचे इकबाल चांदले आदींनी आपल्या भाषणात सुनील तटकरे यांच्यावर हल्ला चढवला. महाडचे आमदार भरत गोगावले, माजी आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हाप्रमुख रवि मुंढे यांच्यासह मुस्लीम तरुण मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी झाले होते.
नाविद अंतुले यांचा शिवसेना प्रवेश ही एक ऐतिहासिक घटना आहे. एकमेकांपासून दूर असलेले दोन मुख्य प्रवाह यामुळे एकत्र येणार आहेत. दोन्ही प्रवाह एकत्र आल्याने विकासाचा नवीन मार्ग
खुला होईल.
-अनंत गीते, उमेदवार रायगड मतदारसंघ