Breaking News

दिल्लीपुढे हैदराबादची शरणागती

हैदराबाद : वृत्तसंस्था

दिल्लीने यजमान हैदराबादला 39 धावांनी पराभूत केले आणि सलग चौथा सामना जिंकला. कॉलिन मुनरो (40) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (45) यांच्या फटकेबाजीच्या बळावर दिल्लीने हैदराबादला सामना जिंकण्यासाठी 156 धावांचे आव्हान दिले होते, मात्र कागिसो रबाडा, ख्रिस मॉरिस आणि किमो पॉल या वेगवान मार्‍यापुढे हैदराबादचा संघ 116 धावांत गारद झाला. रबाडाने सर्वाधिक चार बळी टिपत ‘पर्पल कॅप’ मिळवली.

156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात करून दिली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी मिळून आठव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले, पण त्यानंतर बेअरस्टो 41 धावांवर झेलबाद झाला. दीर्घ विश्रांतीनंतर संघात आलेला कर्णधार विल्यमसनदेखील लवकर माघारी परतला. त्याने केवळ 3 धावा केल्या. नवख्या रिकी भुईलाही चांगली कामगिरी करता आली नाही. 12 चेंडूंत 7 धावा करून तो बाद झाला.

वॉर्नरने एक बाजू लावून धरली होती. चार षटकांत 52 धावांची गरज असताना हैदराबादची धावसंख्या 3 बाद 106 होती, पण त्यानंतर वॉर्नर अर्धशतक करून माघारी गेला. फटकेबाजीच्या प्रयत्नात तो अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. त्याने 47 चेंडूंत 51 धावा केल्या. वॉर्नरनंतरच्या चेंडूवर विजय शंकरही 1 धाव काढून बाद झाला. तो बाद झाल्यावर पत्त्याचा बंगला कोसळावा तसा हैदराबादचा डाव कोसळला आणि 116 धावांमध्ये आटोपला. सलामीवीर वॉर्नर आणि बेअरस्टो वगळता कोणीही दोन अंकी धावसंख्या गाठली नाही.

त्याआधी नाणेफेक जिंकून कर्णधार केन विल्यमसनने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय त्याच्या सहकार्‍यांनी सार्थ ठरवला. हैदराबादकडून खलिल अहमदने सर्वाधिक तीन बळी घेतले. दिल्लीच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ (4) खलिल अहमदच्या गोलंदाजीवर झटपट माघारी परतला. शिखर धवनही (7) मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेल देऊन बाद झाला. यानंतर कॉलिन मुनरो (40) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (45) जोडीने भागीदारी रचत संघाचा डाव सावरला, मात्र मुनरो माघारी परतल्यानंतर दिल्लीचा डाव परत कोलमडला. ऋषभ पंतने काही काळ फटकेबाजी केली, त्या जोरावर दिल्लीला 155 धावांपर्यंत मजल मारता आली.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply