‘ज्ञानदाता’ समाजघटकातील प्रत्येकाला, आपल्या सोयीनुसार, आपल्या घरात, घराबाहेरील मोकळ्या जागेत, अगदी मोजक्या व इच्छुक नात्यातल्या, गोतातल्या, परिचयाच्या विद्यार्थ्यांसाठी, ‘सुरक्षित’असे ‘बिंदु शिक्षण’ देणे शक्य आहे. ते घेणार्यांनी आपली गरज ओळखून ‘देणेकर्यांना’ प्रतिसाद देणेही गरजेचे आहे. अशा अनेक बिंदूंनी सिंधुशिक्षणाची गरज अंशतः तरी भागू शकते. काय शिकवायचे हेही ठरवणे गरजेचे आहे. हे स्पष्ट आहे की, प्रचंड वैविध्यामुळे व प्रशिक्षणाअभावी, शालेय वा महाविद्यालयीन अभ्यासक्रम शिकविणे अनेक दृष्टींनी व्यवहार्य नाही. परंतु, वादातीत लिखिताचे सामुदायिक वाचन, विविध हस्तकौशल्ये, पाढे पाठांतर, जीवनविषयक सुभाषिते, सामुदायिक व्यायाम, मर्यादित परिघातील शारीरिक खेळ, बौद्धिक खेळ, अंकगणित, इंग्रजी संभाषण, कोडी सोडविणे, संगीत गायन, चित्रे काढणे, तारतंत्री किंवा वायरिंग, नळजोडणी किंवा प्लंबिंग यासारखे शिक्षणक्रम, ज्ञानदात्याच्या कौशल्यानुसार व शिकणार्याच्या वयोगटानुसार शिकविता येतील. सदर शिक्षणक्रम परिघीय किंवा पेरीफेरल असल्याने त्यांना फारसे वयबंधन असणार नाही आणि ते कायमही शिकले-शिकविले जाऊ शकतील. सध्याच्या भीषण आणि अकल्पित परिस्थितीत, शिक्षणक्षेत्र नाळच तोडणारा, अनाकलनीय हलकल्लोळशांत व्हावा यासाठी, त्याची कारणे व त्यावरील उपाय शोधणारी ही प्रामाणिक मांडणी. कदाचित कोणाला ती अतिरंजितही वाटेल. या मांडणीच्या कशाही असण्यावर, कुण्यातरी महाशयाने, विद्वानाने, शिक्षणाविषयी आस्था व प्रेम असणार्याने, प्रतिसादावे, चर्चावे, भांडावे, तंटावे पण अबोला सोडून जागरूक व्हावे ही आर्जवी विनंती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टिळक, आगरकर, ज्योतिबा, सावित्रीबाई, राजर्षी शाहू, कर्मवीर यासारख्या दिग्गजांनी सारथ्य केलेल्या शिक्षणरथाचे चाक परिस्थितीच्या गाळात रुतते आहे. जागरूक जनता-जनार्दनाचा रेटाच ते बाहेर काढण्यासाठी गरजेचा आहे. तो रेटा, वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावरून यावा, यासाठी काही चळवळ उभी करण्याचाही प्रयत्न आहे. अर्थात ती उभी होईतोपर्यंत वैयक्तिक, कौटुंबिक वा गृहसंकुल स्तरावर रेट्याचा प्रारंभ केल्यास त्याचे लाभ नक्कीच होऊ शकतात. ‘जडणघडण’च्या माध्यमातून ते घडल्यास सोनेपे सुहागा. (समाप्त)
-डॉ. श्याम जोशी, स्वेच्छानिवृत्त प्राचार्य, डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण