Breaking News

राज्यातील वीज कामगारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
राज्यामधील वीज कामगार, वीज अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सुमारे 16 कोटी जनता व सुमारे दोन कोटी 88 लाख वीज ग्राहकांना वीजपुरवठा मिळेल या दृष्टीने राज्यातील सुमारे 86 हजार वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार अहोरात्र झटत आहेत. मार्च 2020पासूनच्या लॉकडाऊनपासून आजपर्यंत कोरोना साथीच्या कालावधीत वीजपुरवठ्यावर अतिशय भार पडलेला आहे. कोविड रुग्णालयांना अखंड वीजपुरवठा करण्याचे काम हे वीज महामंडळातील सर्व कर्मचारी, अधिकारी अहोरात्र करीत आहेत. राज्याला फैयान व तौक्ते चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यामध्ये तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भामधील अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये वीजवाहक झाडांची मोडतोड होऊन बर्‍याच वेळा वीजपुरवठा खंडीत झालेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी या कर्मचार्‍यांनी प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून युद्धपातळीवर काम केले आहे, याची आपणास कल्पना आहेच.
राज्यातील विद्युत महामंडळाच्या अखत्यारीतील कर्मचार्‍यांच्या सेवा अत्यावश्यक गणल्या जात आहेत. तथापि, पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांप्रमाणे त्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा दिला गेलेला नाही.  पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचारी यांचे तुलनेत वीज महामंडळातील कर्मचार्‍यांचे कामदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे वीज महामंडळातील कर्मचार्‍यांच्या, अधिकार्‍यांच्या, अभियंत्यांच्या कामाचे महत्त्व विचारात घेऊन त्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा बहाल करावा व त्या अनुषंगाने वीज कर्मचारी व त्यांचे कुटूंब यांचे लसीकरण, मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना देय आर्थिक लाभ देण्याचा तातडीने विचार व्हावा अशी वीज कर्मचारी,
अधिकारी, अभियंते संघटना संयुक्त समिती यांनी मागणी केली आहे. त्यानुसार योग्य ती कार्यवाही व्हावी, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply