खालापूरपाठोपाठ कर्जतमध्येही सुरेश लाड यांचा निषेध
कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत शहरात उभ्या राहत असलेल्या प्रशासकीय भवन इमारतीच्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. माजी सुरेश लाड यांनी प्रतिकात्मक भूमिपूजनावेळी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंगळवारी (दि. 1) रस्त्यावर उतरले होते. या वेळी शिवसेनेच्या नादी लागू नका, असा इशारा तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला.
कर्जतमध्ये 27 मे रोजी प्रशासकीय भवन भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते होणार होता, मात्र त्यागोदरच माजी आमदार सुरेश लाड यांनी कार्यक्रम ठिकाणी जात प्रतिकात्मक भूमिपूजन केले तसेच कर्जत येथील प्रशासकीय भवनासाठी आम्ही शासनाकडे प्रयत्न करून मंजुरी मिळवली होती आणि त्या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या पालकमंत्री, महसूलमंत्री यांना डावलून जर भूमिपूजन केले जाणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा लाड यांनी शिवसेनेला दिला होता, तर त्यानंतर आमदार थोरवे यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनानंतर त्यांनी आपल्या भाषणात आघाडीत बिघाडी झाल्याशिवाय राहणार नाही, असा सूचक इशारा दिला होता. येथून राष्ट्रवादी व शिवसेनेत पडलेल्या ठिणगीने दोन्ही पक्षांत संघर्ष पेटला आहे. माजी आमदार लाड यांनी भूमिपूजनावेळी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी तसेच आमदार थोरवे यांच्या समर्थनार्थ मंगळवारी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे कर्जत दहिवली येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात जमले होते. त्यांनी माजी आमदारांचा निषेध करीत 15 वर्षे केले काय, अशा घोषणा दिल्या.
या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, सल्लागार भरत भगत, महिला जिल्हा आघाडी प्रमुख रेखा ठाकरे, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, विधानसभा संघटक संतोष भोईर, उपतालुकाप्रमुख अंकुश दाभणे, बाबू घारे, नगरसेवक संकेत भासे, रमेश मते, शिवराम बदे, अमर मिसाळ, रेश्मा म्हात्रे, शुभांगी कडू, राहुल विशे, प्रमोद सुर्वे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.