Breaking News

मॅसेजमुळे कर्जतमधील दुकाने उघडली

कारवाईमुळे व्यापार्‍यांना गाठावे लागले पोलीस ठाणे

कर्जत : प्रतिनिधी

येथील व्यापारी फेडरेशनच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत उघडी ठेवावीत, असा मॅसेज आल्याने कर्जत बाजारपेठेतील व्यापार्‍यांनी बुधवारी (दि. 2) सकाळी सर्व दुकाने उघडली. मात्र अकराच्या सुमारास पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यामुळे व्यापार्‍यांना पोलीस ठाणे गाठावे लागले. पोलीस निरीक्षकांनी आदेश समजावून सांगितल्यानंतर या गोंधळावर पडदा पडला.

मंगळवारपासून लॉकडाऊनची नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंतच जीवनावश्यक सेवेची दुकाने उघडी ठेवावीत, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांकडून पारित झाले.दरम्यान, मंगळवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास कर्जत व्यापारी फेडरेशनच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ’खुश खबर… उद्यापासून सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन या दरम्यान सुरू राहतील’ असा मेसेज आला. त्यामुळे कर्जतमधील व्यापारी खुश झाले.

  बुधवारी सकाळी व्यापार्‍यांनी आपली दुकाने उघडली व व्यवसाय सुरूही केला. महिना – दीड महिन्यापासून बंद असलेली ज्वेलर्स, कपडे, भांडी, जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक्स दुकानेही उघडण्यात आली. मात्र अकरा वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू आल्हाट आणि पोलीस कर्मचारी रुपेश म्हात्रे यांनी दुकाने बंद करण्यास सांगितले. त्यामुळे व्यापार्‍यांत गोंधळ उडाला. काही वेळ व्यापारी व पोलिसांमध्ये वाद – विवाद झाला. पोलिसांनी नऊ व्यापार्‍यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांनतर रायगड जिल्हा शांतता समिती सदस्य रणजित जैन, सराफ असोसिएशनचे मोहन ओसवाल, कर्जत किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मदन परमार, कर्जत सराफ असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण भलगट, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेश ओसवाल, साजन ओसवाल,  लालजी राजपुरोहित, नगरसेवक बळवंत घुमरे, गणेश जोशी आदिंनी व्यापार्‍यांसह पोलीस निरीक्षक अरुण भोर यांची भेट घेतली. या वेळी पोलीस निरीक्षक भोर यांनी जिल्हाधिकार्‍यांनी पारित केलेल्या आदेशाच्या प्रति दाखवून पनवेल व उर्वरित जिल्ह्यासाठी असलेले नियम दाखविले.

त्यानंतर रणजित जैन यांनी ’जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाची उकल न झाल्याने पोलीस अधिक्षक आणि उप आयुक्त कार्यक्षेत्रामुळे गोंधळ उडाला. त्यामुळे दुकाने उघडी ठेवावीत मेसेज आला आणि दुकाने उघडण्यात आली. गैरसमजामुळे हा प्रकार झाला. त्यामुळे आपण ताब्यात घेतलेल्या नऊ व्यापार्‍यांवर कारवाई करू नये.’ अशी विनंती केली.

मोहन ओसवाल यांनी ’पोलिसांचे नेहमीच सहकार्य असते. व्यापारीसुद्धा पोलिसांचा नेहमीच आदर करतात. एक वेळ व्यापारी वर्गाला संधी द्यावी. आम्ही सर्व नियमाप्रमाणेच व्यवसाय करू.’ असे सांगितले.

पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनी व्यापारी प्रतिनिधींची विनंती मान्य करून ’त्या’ व्यापार्‍यांना सोडून दिले व झालेल्या गोंधळावर पडदा पडला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply