नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
5 जून हा जागतिक पर्यावरण दिन सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमात ऑनलाइन साजरा करण्यात आला. या वेळी इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षिका अल्फान्सो जॉन्सन, स्वाती काळे तसेच उज्वला सिमरिया यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगून पर्यावरण रक्षण आणि संवर्धन करिता सजग केले. दहावी ए च्या शुभदा देशमुख आणि संचीता खोपकर, दहावी बी च्या यश पांडव आणि सिद्धी भोसले तसेच दहावी सी च्या समृद्धी पुरोहित, स्वर्णाली पाटील, श्रेयस म्हात्रे आणि सई जोशी या विद्यार्थिनींनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण, संवर्धन या विषयावर सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली, तसेच यश पांडव या विद्यार्थ्याने सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. विज्ञान विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचा र्हास रोखण्याकरिता कोण कोणती उपाय योजना करता येईल याविषयी जागृत केले. भूगोल शिक्षिका मनीषा नारखेडे यांनी यानिमित्त विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेतली. पर्यावरण रक्षण आणि संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. शालेय जीवनातच या जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे हे आमच्यासारख्या शिक्षकांचे कर्तव्य आहे. या भावनेतूनच फक्त पर्यावरण दिनीच नव्हे तर शाळेच्या सर्वच उपक्रमामध्ये आम्ही पर्यावरण पूरक साधनसामग्रीचा उपयोग करण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत असतो आणि आपल्या जबाबदारीची जाणीवही करून देत असतो, असे याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले. एकंदरीतच ऑनलाइन माध्यमातूनही हा जागतिक पर्यावरण दिन अतिशय उत्साहात शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी साजरा केला.