कर्जत ः प्रतिनिधी
लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्याने कर्जत बाजारपेठेत लक्षणीय गर्दी वाढली आहे. शुक्रवारी बाजारपेठांमध्ये नागरिकांची आणि वाहनांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केल्यावर ही गर्दी ओसरली. दुपारी दोन-अडीचच्या सुमारास अचानक नगर परिषद प्रशासनाने अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सुरू असलेली दुकाने बंद करण्यास सांगितले आणि बाजारपेठेत शुकशुकाट झाला. शनिवारी मात्र नागरिकांना थोडासा वचक बसल्याने तुरळक गर्दी बाजारपेठांमध्ये दिसत होती.
नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष मयूर जोशी यांनी पुढाकार घेऊन कर्जत बाजारपेठेतील दुकानांसाठी व्यापारी बांधवांची सभा घेऊन वेळापत्रक तयार केले होते. त्यानुसार अंमलबजावणीही सुरू झाली. हे तालुक्यातील लोकांना समजताच हळूहळू गर्दी होऊ लागली. शुक्रवारी सकाळी मात्र गर्दीचा उच्चांक झाला. वाहनांची वर्दळसुद्धा कमालीची वाढली होती. जागा मिळेल तेथे बेशिस्तपणे वाहने उभी करून ग्राहक खरेदीसाठी बाजारपेठेत जात होते. वाहनांना शिस्त लावण्यासाठी महिला वाहतूक पोलीस मनाली शिंदे आणि त्यांच्या सहकारी जीवाचा आटापिटा करताना दिसत होत्या. नाईलाजाने वाहनाचा फोटो काढून ऑनलाइन दंड आकारणी त्यांनी सुरू केली, तरीसुद्धा वाहनधारक आपली मनमानी करीतच होते. दुपारी दोन-अडीचच्या सुमारास नगर परिषदेचे कर्मचारी आले आणि त्यांनी अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या. परिणामी केवळ अर्ध्या तासात बाजारपेठेत शुकशुकाट झाला. हा आदेश रायगड जिल्ह्यधिकार्यांकडून आल्याचे सांगण्यात येत होते.