Breaking News

यंग इंडिया श्रीलंकेशी भिडणार

वन डे आणि टी-20 मालिकेचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतीय युवा क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंका दौरा करणार आहे. या दौर्‍यात उभय संघांत तीन वन डे आणि तीन टी-20 मालिका खेळवण्यात येतील. या मालिकेचे वेळापत्रक समोर आले आहे. 13 जुलै ते 25 जुलै या काळात टीम इंडिया श्रीलंकेला भिडेल. कोरोनाचे संकट पाहता सर्व सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील.
भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौर्‍यावर असून श्रीलंका दौर्‍यासाठी नवीन आणि युवा खेळाडूंचा संघ पाठवला जाणार आहे. या दौर्‍यासाठी शिखर धवनच्या हातात भारतीय संघाची कमान असू शकते. शिवाय मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत सूर्यकुमारने पदार्पण करीत आपल्या गुणांची चुणूक दाखवली होती.
या दौर्‍यासाठी काही नवीन खेळाडूंनाही संधी मिळू शकते. यात चेतन साकारिया, हर्षल पटेल, देवदत्त पडिक्कल, नितीश राणा यांना भारतीय संघात स्थान मिळू शकते. आगामी टी-20 वर्ल्डकपला समोर ठेवून निवडकर्ते या दौर्‍याकडे आणि खेळाडूंकडे लक्ष ठेवणार आहेत.
श्रीलंका दौरा सुरू असताना भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौर्‍यावर असणार आहे. भारताला 18 ते 22 जूनदरम्यान साऊथम्पटन येथे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिकाही त्यांना इंग्लंडमध्ये खेळायची आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply