Breaking News

‘लोकसभा निवडणुकीत आगरी-कोळी ग्रामस्थांनी मतदान करावे’

नवी मुंबई ः वार्ताहर

प्रकल्पग्रस्त आगरी-कोळी युवा मित्रमंडळ, नवी मुंबई संघटनेने नवी मुंबईतील ग्रामस्थांना भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार बजावत होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन केले आहे.

नवी मुंबईत सध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गावोगावी बैठका घेऊन आपण सर्व आगरी-कोळी बांधवांनी एक होऊन निवडणुकीवर बहिष्कार  टाकावा, असे सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त आगरी-कोळी युवा मित्र मंडळाने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, नवी मुंबईतील आगरी-कोळी बांधव पहिलाही एक होता, आजही एक आहे आणि यापुढेही एकच राहणार याबाबत काडीमात्र शंका नाही. त्यामुळे चारचौघांना घेऊन ग्रामस्थांना चिथावणी देऊन आम्हा ग्रामस्थांत फूट पाडू नये. भारतीय संविधानाने आम्हाला जो मतदानाचा अधिकार दिला आहे, तो आम्ही वापरणारच आहोत. त्यामुळे अशा चिथावणीखोर वल्गना करून आम्ही आगरी- कोळी बांधवांनी काय करावे व काय करू नये हे सांगण्याची फाऊंडेशनने तसदी घेऊ नये. आम्ही व आमचा आगरी-कोळी बांधव आजपर्यंत राजासारखे जगलो आहोत. आम्ही आजपर्यंत स्वत:चा निर्णय स्वत: घेतला आहे. यापुढेही स्वत:च घेणार आहोत. त्यामुळे आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घाला, या चिथावणीला बळी न पडता आम्ही स्वत: ग्रामस्थांना मतदान करण्याचे व संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार वापरण्याचे आवाहन करीत आहोत. युथ फाऊंडेशनचे युवक जर कोणाच्या सांगण्यावरून आम्हा ग्रामस्थांमध्ये फूट पाडत असतील, तर त्याला आम्ही दाद तर देणार नाहीच, परंतु अशांना धडा शिकवण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही अध्यक्ष प्रशांत तांडेल, रणजित नाईक, विशाल कोळी, पुण्यनाथ तांडेल, निकेतन पाटील आदींनी दिला आहे.

Check Also

नमक हराम 51 वर्ष

बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है…. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित नमक हराम हा …

Leave a Reply