Breaking News

वाढीव गुण बोर्डाला कळविलेच नाहीत

कर्जतच्या केईएस शाळेतील 56 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पालक संतप्त

कर्जत : बातमीदार

शहरातील कर्जत इंग्लिश मीडियम स्कुलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे यावर्षी शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला, हस्तकला आणि गायन या विषयातील वाढीव गुण शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुंबई बोर्डाला कळविले नाहीत. या प्रकरणी संस्थेने मुख्याध्यापकांची चौकशी सुरू केली आहे, तर पालकांनी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कर्जत इंग्लिश मिडीयम स्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील 123 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.  मुंबई शालांत परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या नियमानुसार या विद्यार्थ्यांना वाढीव गुण  दिले जातात. त्यासाठी मार्च 2019मध्ये परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 29 जानेवारी 2019 ही वाढीव गुणांची यादी बोर्डाकडे सादर करण्याची शेवटची तारीख होती. त्यात शाळेच्या वतीने गणित आणि विज्ञान या विषयातील सर्व 123 विद्यार्थ्यांचे गुण  निर्धारित वेळेत कळविण्यात आले आहेत. तर चित्रकला, हस्तकला, गायन या विषयाशी संबंधित गुण कर्जत इंग्लिश मिडीयम स्कुलने मुंबई बोर्डाला निर्धारीत वेळेत दिले नाहीत. 5 फेब्रुवारी 2019 ही शेवटची तारीख असताना प्रत्यक्षात 15 फेब्रुवारी रोजी शाळेचे मुख्याध्यापक विनोद अडसुंदेकर हे मुंबई बोर्डाच्या वाशी येथील कार्यालयात पोहचले. मात्र बोर्डाच्या वाशी येथील कार्यालयाने कर्जत इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्याांची वाढीव गुणांची यादी स्वीकारली नाही. याबाबतची माहिती शाळेच्या वतीने पालकांना देण्यात आली नव्हती. मात्र 22 मार्च रोजी शाळेच्या वतीने पालकसभा घेऊन ही माहिती देण्यात आली.

ही माहिती मिळताच पालक  संतप्त झाले. त्यानंतर संस्थेने मंगळवारी (दि. 16) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध जोशी, सचिव  श्रीकांत मनोरे आणि विश्वस्त प्रवीण गांगल यांनी संस्थेची भूमिका स्पष्ट केली. त्यात दहावीची परीक्षा देणार्‍या 56 विद्यार्थ्यांचे वाढीव गुणांचे नुकसान होणार नाही, अशी माहिती दिली.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply