Breaking News

पनवेल मनपा क्षेत्रात 18 ते 44 वयोगटाचे 21 जूनपासून लसीकरण

पनवेल : प्रतिनिधी 

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या 45 वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू असून बहुतांशी लसीकरण केंद्रावर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा कमी नागरिकांकडून पहिल्या व दुसर्‍या डोसचा लाभ घेतला जात आहे. 21 जूनपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनाही लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. त्यामुळे 21 जूननंतर लसीकरण केंद्रावर फार मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 45 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांनी तत्काळ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात 16 शासकीय केंद्रावर सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड लसींचा पहिला व दुसरा डोस  दिला जात आहे. तर दोन शासकिय केंद्रावर कोवॅक्सीनचा दुसरा डोस दिला जात आहे. पनवेल कार्यक्षेत्रात अनेकदा लसीकरण केंद्रावर नागरिकांचा अल्पप्रतिसाद मिळत आहे. संभाव्य तिसर्‍या कोविडच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 45 वर्षांवरील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करणे गरजेचे असल्याकारणाने नागरिकांनी आपल्या जवळच्या शासकीय लसीकरण केंद्रावर जाऊन मोफत कोविड लसीकरण करून घ्यावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण अत्यंत फलदायी ठरत आहे. मोठमोठ्या गृहसंकुलातील सोसायटी अध्यक्षांनी सोसायटीमधील 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी आवाहन करावे. जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पुर्ण करण्याचे लक्ष पूर्ण होईल. नागरिकांसाठी लसीकरणाचे वेळापत्रक रोज प्रसिध्द होणार्‍या प्रेस नोटमध्ये दिले जात आहे. ही प्रेस नोट Panvel Muncipal Corporation Covid 19 या महापालिकेच्या फेसबुक पेज तसेच ट्विटरवरती प्रसिध्द होत असते. पनवेल कार्यक्षेत्रातील लसीकरण केंद्रावर रांगेत उभारण्याचा त्रास होऊ नये यासाठी 45 वर्षांवरील दिव्यांग बांधवांना प्राधान्य देऊन  4 वाजेनंतर ‘विनाटोकन’ लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.  तसेच जेष्ठ नागरिकांनादेखील 4 नंतर ‘विनाटोकन’ लसीकरण केले जात आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply