नवी मुंबई : प्रतिनिधी
वाशी प्रभाग क्र.63 मधील नागरिकांसाठी 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना थेट लसीकरणाचा लाभ घेता यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने माजी सभापती संपत शेवाळे, स्थानिक नगरसेविका दयावती शेवाळे यांच्या सौजन्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वाशी व फोर्टिस हॉस्पिटल, वाशी यांच्या माध्यमातून वाशी सेक्टर-17 येथील महात्मा फुले भवन हॉलमध्ये कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या वेळी शेकडो नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला असून प्रभागातील प्रत्येक नागरिकांना लसींचा पुरवठा करण्यात येणार आहे. या वेळी भाजप महिला प्रभाग अध्यक्ष वर्षा झरेकर, उपाध्यक्ष संदीप शेवाळे, डॉ. योगेश म्हात्रे, डॉ. निशा भिसे उपस्थित होते. लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी त्वरित कार्यवाही केल्या बद्दल आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे आभार मानले. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींकरिता कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली असून बेलापूर मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वाशी यांच्या वतीने माजी सभापती संपत शेवाळे यांनी आमदार मंदा म्हात्रे यांचे आभार मानले.