Breaking News

शूर आम्ही सरदार…

नायक सुभेदार साळवी यांची कर्जतमध्ये मिरवणूक

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील भोईरवाडी येथील कासार कुटुंबातील तरुण शरदकुमार 1995 मध्ये देशसेवा बजावण्यासाठी सैन्यात भरती झाला होता. सैन्यदलातील 24 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होऊन घरी परतलेल्या शरदकुमारची कर्जत तालुक्यात मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, आपण मागील 24 वर्षे देशसेवा बजावण्यात पूर्णपणे एकरूप झालो होतो, त्यामुळे घरी, गावाकडे काय चाललेय यांचा विचारदेखील येत नव्हता, अशी देशप्रेमी भावना नायक सुभेदार साळवी यांनी व्यक्त केली.

कर्जत-मुरबाड रस्त्यावर असलेल्या भोईरवाडी गावातील नामदेव कासार आणि लता कासार यांचा शरदकुमार हा पुत्र. शरदकुमार हे 1995 मध्ये सैन्यात भरती झाल्यानंतर साळवी नावाने सैन्यात ओळखले जाऊ लागले. शरदकुमार यांची पहिली पोस्टिंग गोव्यात झाली. त्या ठिकाणी असलेल्या विस्तीर्ण समुद्र किनार्‍यांची सुरक्षा जबाबदारी पार पाडल्यानंतर 1999च्या कारगिल युद्धकाळात नायक सुभेदार शरदकुमार हे पंजाब राज्यात सेवेत होते. देशाने कारगिल युद्ध जिंकल्यानंतर जवानांनी आनंद कसा साजरा केला, याचा आखोदेखा हाल शरदकुमार यांनी आपल्या घरी पत्राने कळविले होते. त्यानंतर मध्य प्रदेश राज्यातील महू, जम्मू काश्मीर बॉर्डरवर लेह लडाख, राजस्थानमध्ये जोधपूर, आसाम राज्यात बिनाकुर्डी, हरियाणा राज्यात डीसार येथे आणि महाराष्ट्रातील पुणे येथे सेवा बजावून शरदकुमार सेवानिवृत्त झाले आहेत.

भारतीय सैन्य दलात 24 वर्षे सेवा बजावून नायक सुभेदार पदावरुन 2 मे रोजी सेवानिवृत्त झालेले शरदकुमार नामदेव साळवी यांचे कर्जत रेल्वे स्थानकात आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रथम शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. वेदमाता देवी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर भोईरवाडी ग्रामस्थांनी शरदकुमार यांची कर्जत येथून मिरवणूक काढली. ही मिरवणूक भोईरवाडी गावापर्यंत वाजत गाजत नेण्यात आली. या दरम्यान, कर्जत तालुक्यातील अनेक  तरुणांनी शरदकुमार यांच्यासोबत सेल्फी काढले, तर अनेकांनी त्यांना पुष्पहार घालून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी या शरदकुमार यांच्यासोबत कर्जत येथून भोईरवाडीपर्यंत पोहचल्या होत्या. भोईरवाडी गावात शरदकुमार यांचे अभिनंदन करण्यासाठी परिसरातील किमान दोन हजार लोकांनी गर्दी केली होती.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply