पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार जोेमाने सुरू आहे. सोमवारी (दि. 15) सायंकाळी पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटी आणि आशापुरी नगर येथील प्रचारादरम्यान महायुती आणि महाआघाडी अशा दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समोरासमोर आले. या वेळी कोणत्याही प्रकारचा वाद किंवा गोंधळ न घालता त्यांनी लोकशाहीचे दर्शन घडविले.
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर 100 ते 125 कार्यकर्त्यांसह महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करीत असताना विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे 15 ते 20 कार्यकर्त्यांसह समोर आले. या वेळी ठाकूर यांनी म्हात्रे व महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना श्रीरंग बारणे यांना मत देण्याचे आवाहन केले; तर म्हात्रे यांनी ठाकूर व महायुतीच्या कार्यकर्त्यांना पार्थ पवार यांना मत देण्याचे आवाहन केले.
‘त्या’ फोटोमागचे व्हायरल सत्य उघड
पार्थ पवार यांचे परिचयपत्रक प्रीतम म्हात्रे हे परेश ठाकूर यांना देत असतानाचा फोटो सोमवारी रात्री समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. ‘आता सांगा कोण निवडून येणार? बारणे की पार्थ’ अशी टॅगलाईनसुद्धा सोबत होती. दुसर्याच दिवशी भाजपकडून श्रीरंग बारणे यांचे प्रचारपत्रक परेश ठाकूर हे प्रीतम म्हात्रे यांना देत असल्याचा फोटो समाजमाध्यमांवर झळकला. त्यानंतर जसे प्रचारादरम्यान हे नेते समोरासमोर आले होते तसे या फोटोमागचे व्हायरल सत्य समोर आले.