Breaking News

कीर्तन आणि तमाशा

वरून कीर्तन आणि आतून तमाशा अशी अवस्था महाविकास आघाडी सरकारची झालेली आहे. वरकरणी सारे काही आलबेल असल्याचे दिलासे देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते वारंवार टीव्ही कॅमेर्‍यांसमोर येत असतात. आमचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल अशी दर्पोक्ती करत असतात. सत्तेत सहभागी असलेले तिन्ही पक्ष एकमेकांशी उत्तम समन्वय असल्याचा देखावा करत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती फारच वेगळी आहे आणि ती जनतेलाही ठाऊक झाली आहे.

मुळात सत्तेसाठी एकत्र आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची आघाडी अनैसर्गिकच आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यावर थोपण्यात आलेल्या या आघाडी सरकारचे काही खरे नाही हे पहिल्या दिवसापासूनच स्पष्ट झाले होते. या तिन्ही पक्षांमधील अंतर्विरोध वारंवार दिसून आला आहे. या अंतर्विरोधामुळेच स्वत:च्या वजनाने हे सरकार पडेल असे भारतीय जनता पक्षाचे नेते स्वच्छपणे सांगताना दिसतात. त्याची झलक आता बघायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मध्यंतरी स्वबळाचा नारा दिला. अनेकांना तो हास्यास्पद वाटला. एखाद्या काडी पैलवानाने हिंदकेसरीसमोर दंड थोपटण्यासारखे ते होते. काँग्रेस अध्यक्षांनी दिलेला स्वबळाचा नारा कितीही विनोदी वाटला तरी महाविकास आघाडीमध्ये मात्र त्याचे हादरे बसले आहेत. काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेमुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही कमालीचे नाराज झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यात तथ्य असो वा नसो, पण झालेल्या प्रकारामुळे तिन्ही पक्षांना जोडणारा एकमेव दुवा म्हणजे सत्तेचा मलिदा एवढाच आहे हे उघड झाले. एकीकडे शिवसेनेने मागल्या दाराने भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेण्यासाठी चाचपणी सुरू केल्याची चिन्हे दिसत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीही काँग्रेसला सुरक्षित अंतरावर ठेवण्यासाठी धडपडत आहे. या तिन्ही पक्षांच्या भांडणात सर्वात दुबळा पक्ष ठरतो तो काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्षाकडे ना कार्यक्रम, ना धोरण, ना कार्यकर्ते, ना नेतृत्व. अर्थात अन्य दोन पक्षांकडे हे चारही घटक मुबलक उपलब्ध आहेत असेही नाही. त्यातल्या त्यात शिवसेनेकडे कार्यकर्त्यांची फौज आहे आणि राष्ट्रवादीकडे सक्षम नेतृत्व. काँग्रेसकडे राज्य पातळीवर या सार्‍या गोष्टींची वानवाच आहे. पण दुर्दैवाने केंद्रीय पातळीवरही या पक्षाची अवस्था केविलवाणीच आहे. काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व नेमके कोणाकडे आहे याचा पत्ताच लागत नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी हे फक्त ट्विटरवर पंतप्रधान मोदी आणि भाजपवर बेछूट टीका आणि आरोप करत असतात. या पलीकडे पक्षासाठी त्यांनी काही भरीव केले आहे असे दिसत नाही. आपले नेतृत्व नेमके कोण करते हे राज्य पातळीवर नेत्यांना देखील समजत नसल्यामुळे या पक्षात सगळाच सावळा गोंधळ आहे. येत्या काही काळामध्ये या तीन चाकी बिघाडी सरकारचे काही बरे-वाईट झाले तर त्याचे खापर भाजपच्या राजकारणावरती फोडण्याची संधीही उरलेली नाही. अर्थात तसे काही घडले तर पर्यायी सरकार देण्यासाठी भारतीय जनता पक्ष सक्षम आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तशी ग्वाही पुन्हा एकदा दिलीच आहे. एकंदरीत वरकरणी महाविकास आघाडीमध्ये एकजुटीचे चित्र दाखवण्यात येत आहे. पण आतमध्ये मात्र असंतोषाची प्रचंड खदखद दिसून येते. हे फार वेळ चालू शकणार नाही.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply