महाड : प्रतिनिधी
दाट धुके आणि अधूनमधून पडणारा पाऊस अशा वातावरणात किल्ले रायगडावर बुधवारी (दि. 23) तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेकाचा तिथीनुसार येणारा वर्धापनदिन शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकण कडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा केला जातो. बुधवारी पहाटेच्या मंगलमय वातावरणात ढोल ताशांचा गजर आणि छत्रपती शिवरायांचा जयघोषात या सोहळ्याला प्रारंभ झाला. गडावरील विविध देवदेवतांची विधीवत पूजा झाल्यानंतर धर्मशाळा ते राजदरबार अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. महाराजांची पालखी राजदरबारात दाखल होताच शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला सुरूवात झाली. शिवरायांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून सप्तसिंधुंच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. या वेळी राजदरबारात असलेली मेघडंबरी फुलांच्या माळांनी सजविली होती. या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींसह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.