Breaking News

नव्याने संघबांधणीची गरज : विराट कोहली

जागतिक कसोटी अजिंक्यपद गमावल्यानंतर कर्णधाराचे संकेत

लंडन ः वृत्तसंस्था
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताच्या कसोटी संघाचा योग्य आढावा घेऊन त्यानुसार बदल करण्याची गरज आहे, असे स्पष्टीकरण कर्णधार विराट कोहलीने व्यक्त दिले. याशिवाय काही खेळाडूंच्या धावा न करण्यावरही कोहलीने खंत व्यक्त केली.
साऊदम्पटन येथे झालेल्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने भारताला आठ गडी राखून धूळ चारली. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करूनही मोक्याच्या क्षणी निराशाजनक कामगिरी केल्यामुळे भारताच्या हातून जेतेपद निसटले. त्यामुळे सध्या क्रीडा विश्वात कोहलीच्या नेतृत्वकौशल्याबरोबरच संघातील अन्य खेळाडूंच्या योगदानाविषयी चर्चा रंगत आहेत. कोहलीने मात्र अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या संघाचे समर्थन केले आहे.
‘जागतिक अजिंक्यपदाचा अंतिम सामना गमावल्यामुळे आमचा संघ वाईट ठरत नाही. संघातील प्रत्येक खेळाडूची निवड योग्य होती, मात्र काही कमकुवत बाजूंचा आढावा घेण्याची निश्चितच गरज आहे. ज्याप्रमाणे मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारताकडे प्रत्येक स्थानासाठी किमान दोन ते तीन पर्याय उपलब्ध असतात. त्याप्रमाणेच कसोटी प्रकारासाठी परिपक्व आणि मानसिकदृष्ट्या सक्षम खेळाडूंची फौज तयार करण्यास आमचे प्राधान्य असेल,’ असे कोहली म्हणाला.
सर्वोत्तम तीन अंतिम सामन्यांचा पर्याय असावा
एखाद्या सामन्यातील सुमार कामगिरीमुळे जेतेपद गमावल्यामुळे कोहलीने नाराजी व्यक्त करतानाच पुढील वेळेपासून सर्वोत्तम तीन अंतिम सामन्याच्या पर्यायाचा अवलंब करण्यात यावा, असे सुचवले. अंतिम फेरीतही एकच सामना खेळवण्यापेक्षा किमान तीन लढती असाव्या. या तीन सामन्यांतील कामगिरीवरून तुम्ही आमचा संघ कसा खेळला याचे आकलन करा. सर्वोत्तम तीन अंतिम सामन्यांमुळे चाहत्यांनाही कसोटी क्रिकेटचा अधिक आनंद लुटता येईल आणि खेळाडूंच्या कौशल्याचा कस लागेल, असे कोहली म्हणाला. याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी भारतासाठी एकही सराव सामना आयोजित न केल्याच्या मुद्द्याकडेही कोहलीने लक्ष वेधले.

माझ्यासह सर्वच फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. संघातील काही फलंदाजांमध्ये धावा करण्याचा दृढनिश्चय दिसला नाही. प्रत्येकाला खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ लागतो हे मान्य असले तरी यामुळे सामना हातून निसटणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः पावसामुळे आधीच खेळ वाया गेलेला असताना फलंदाजांनी अतिबचावात्मक पवित्रा अवलंबणे धोक्याचे ठरते.
-विराट कोहली

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply