Breaking News

लसीकरण मोहिमेत योगदान द्या!

पंतप्रधानांचे ‘मन की बात’मधून देशवासीयांना आवाहन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 27) मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी कोरोनाच्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असल्याचे आवर्जून सांगितले, तसेच लसीसंबंधीच्या अफवांपासून दूर राहून लसीकरण मोहिमेत आपले योगदान द्या, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले आहे.          
21 जूनला लसीकरण मोहिमेचा पुढील टप्पा सुरू झाला आणि त्याच दिवशी देशातील 86 लाखांहून अधिक लोकांनी विनामूल्य लस घेऊन विक्रम केला. इतक्या मोठ्या संख्येने भारत सरकारने विनामूल्य लसीकरण उपलब्ध केले. या वेळी ऑलिम्पिकशी संबंधित चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे दिवंगत महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.
मध्य प्रदेशमधील बैतूल येथील राहणार्‍या ग्रामीण भागातील एका व्यक्तीला गावातील लसीकरणाबाबत मोदींनी विचारपूस केली. गावातील लोकांचे लसीकरण न करण्याचे कारण ऐकूण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धक्का बसला. या वेळी मोदी म्हणाले की, मी आणि माझ्या आईने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तुम्हीही लस घ्या. जर कोणी लस घेण्यास नकार देत असेल किंवा अफवा पसरवत असेल तर त्यांना समजवा. लसीच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोरोना महामारीवर विजय मिळवायचा असल्यास लस घेणे गरजेचे आहे.
कोरोना नियमांचे पालन करा. जेव्हा लसीकरणाचा नंबर येईल तेव्हा नक्की लस घ्या. जोपर्यंत प्रत्येकाचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत केंद्र सरकार स्वस्थ बसणार नाही. कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पनवेल कार्यालयात थेट प्रक्षेपण
दरम्यान, पनवेल येथील भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात ‘मन की बात’चे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पनवेल तालुका युवा मोर्चा ग्रामीणचे अध्यक्ष आनंद ढवळे, झोपडपट्टी सेल संयोजक चंद्रकांत मंजुळे, प्रभाग 19चे अध्यक्ष पवन सोनी, सपना पाटील, मधुकर उरणकर, नितीन वास्कर, राजेंद्र कोळी, संतोष ढगे आदी उपस्थित होते.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply