कळंबोली : रामप्रहर वृत्त : कळंबोलीतील प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेवक अमर अरुण पाटील यांच्या प्रयत्नातून रोडपाली गावाच्या पाठोपाठ आता शहर परिसराचाही विकास झपाट्याने सुरू आहे. या परिसरातील विकासकामांसाठी मनपाने सुमारे चार कोटींचा निधी मंजूर केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारातून आणि नगरसेवक अमर पाटील यांच्या पाठपुराव्यातून नवीन रोडपाली शहराला भेडसावणार्या पाण्याचा मोठा प्रश्न आता सुटला असून, त्या पाठोपाठ या ठिकाणी मोकळ्या भूखंडावर देखील सुसज्य असे सर्व सोयीसुविधांयुक्त उद्यानाची उभारणी केली जात आहे. या दोन्ही विकासकामांसाठी सुमारे तीन कोटी 91 लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. लवकरच या कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार असल्याचे नगरसेवक अमर पाटील यांनी सांगितले. कळंबोली शहरातील सेक्टर 16, 17, 20, येथील नागरिकांच्या पाण्याचा मोठा जिव्हाळ्याचा विषय आता मार्गी लागलेला असून पाण्यासाठी सुमारे तीन कोटी 41 लाखांची तरतूद असून यासाठी सेक्टर 2 इ येथील एम बी आर ते 16 इ एम बी आर पर्यंत ही जलवाहिनी करण्यात येत आहे. सुमारे 2.9 किलोमीटर व 600 मीटर व्यासाची ही जलवाहिनी असणार आहे. त्यामुळे येथील सेक्टर 16, 17, 20 भागातील नागरिकांचा आता पाण्यामुळे घसा सुकणार नाही, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे सेक्टर 20 येथील प्लॉट नंबर 26 या ठिकाणी उभारल्या जाणार्या उद्यानासाठी 50 लाख रुपयांची तरतूद सिडको महामंडळाच्या वतीने केली जात आहे. यामध्ये 25 बाक, 421 मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक, लहानग्यांसाठी 800 मीटरचे खुले मैदान अशा स्वरूपात 5825 मीटरच्या उद्यानाची उभारणी केली जात आहे. यामध्ये विविध प्रकारचे आकर्षक झाडे यांचा समावेश आहे.
नागरिकांच्या मागणीनुसार दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. अखेर त्याला यश मिळाल्याचे समाधान आहे. माझ्या प्रभागाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असून नागरिकांना दिलेले वचन मी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारातून साकार करीत आहे.
-अमर पाटील, नगरसेवक