सार्वजनिक मूर्ती चार, तर घरगुती दोन फुटांची
मुंबई ः प्रतिनिधी
राज्य सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही निर्बंध घालण्यात आले असून सार्वजनिक गणेशमूर्ती चार फूटांची, तर घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांची असावी अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला गणेशोत्सवाचे वेध लागले असून या वर्षी हा उत्सव जल्लोषात आणि नेहमीच्या थाटात साजरा होईल, अशी आशा होती, मात्र कोरोनाच्या दुसर्या लाटेने त्यावर पाणी फेरले. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही उत्सवावर कोरोनाचे विघ्न कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली निर्धारित केली आहे.
सार्वजनिक ठिकाणच्या गणेशमूर्तीसाठी चार फूट, तर घरगुती गणेशमूर्तीला दोन फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे, मात्र यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी घेतलेली आहे.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना
गणेशोत्सवासाठी महामंडळांनी महापालिका वा स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असेल. कोरोनामुळे महापालिका वा स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या धोरणानुसार मर्यादित स्वरूपातच मंडप उभारण्यात यावा. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणे अपेक्षित असल्याने भपकेबाज सजावट करणे टाळावे. सार्वजनिक गणेश मंडळातील मूर्तीची उंची चार फूट आणि घरातील मूर्तीची उंची दोन फुटांपेक्षा जास्त नसावी. शक्य असल्यास गणेशमूर्तीऐवजी धातूच्या वा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावं. शक्यतो घरच्या घरी मूर्तीचे विसर्जन करावे. ते शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्ती विसर्जित करावी. स्वच्छेने दिलेल्या देणग्याच स्वीकाराव्यात. जाहिरातींमुळे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. आरोग्यविषयक आणि सामाजिक संदेश देणार्या जाहिराती करण्याला प्राधान्यक्रम द्यावा. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम वा शिबिरे घेण्याला प्राधान्य देण्यात यावे. स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध गणेशोत्सवातही कायम असतील, ते शिथिल केले जाणार नाहीत. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्यात यावे. नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणेश दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्किंग, वेबसाइट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी. गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नये. विसर्जनस्थळी करण्यात येणारी आरती घरीच करावी. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे. चाळीतील आणि इमारतीतील गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्र काढू नये. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारसह, आरोग्य विभाग, महापालिका प्रशासन, स्थानिक पोलीस प्रशासन यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात यावे.