Breaking News

कर्नाळा बँकेचे ठेवीदार अधांतरीच

रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर फक्त पाच लाखांपर्यंतच्या ठेवीच मिळणार परत

पनवेल ः प्रतिनिधी
बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या पाच लाखांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या दोन हजार 458 ठेवीदारांना विमा कंपनीचा दिलासा मिळणार नसल्याने त्यांच्या 270 कोटी 72 लाख रुपयांचे काय होणार, असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे. पाच लाखांपेक्षा कमी असलेल्या ठेवीदारांनाही ठेवी परत मिळण्यासाठी बँकेचा परवाना (लायसन्स) रद्द होऊन बँक अवसायनात निघण्याची वाट पहावी लागणार आहे.
कर्नाळा नागरी सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आली आहे. त्यामुळे 50 हजारांहून जास्त ठेवीदारांना त्याचा मोठा फटका बसला आहे. बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील सध्या तुरूंगात आहेत.
कर्नाळा बँकेने डीआयसीजीसीकडे 38 लाख 82 हजार रुपयांचा प्रीमियम भरला असल्याने 48 हजार ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळतील अशी आशा दाखवण्याचा प्रयत्न संबंधितांकडून करण्यात येत आहे. या ठेवी परत मिळण्यासाठी कर्नाळा बँकेचे लायसन्स आरबीआयने रद्द करून ही बँक अवसायनात काढावी लागेल. त्यानंतरच पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येऊ शकते.
या बँकेचे पाच लाखांपर्यंत लहान मोठे 48 हजार 231 ठेवीदार असून 512 कोटी रुपयांच्या घोटाळ्यापैकी पाच लाखांखालील ठेवीदारांच्या एकत्र मिळून 241 कोटी 28 लाख ठेवी कर्नाळा नागरी सहकारी बँकेत अडकल्या आहेत. त्यामध्ये पाच लाखांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या ठेवीदारांची संख्या दोन हजार 458 आहे. त्यांचे 270 कोटी 72 लाख रुपयांना विम्याचे संरक्षण नसल्याने त्यांचे पैसे बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कर्नाळा बँकेच्या संचालकांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी सुरू आहे. बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आली असली तरी इतर संचालकांवर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यांच्या चौकशीनंतरच बँकेचे लायसन्स आरबीआय रद्द करून बँक अवसायनात काढू शकते, मात्र यासाठी किती कालावधी लागेल हे निश्चित सांगता येणार नाही. ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर परत देण्यासाठी जबाबदार संचालक आणि कर्मचारी यांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करणे आवश्यक आहे. माजी आमदार विवेक पाटील यांच्या जप्त केलेल्या वाहनांचा अद्याप लिलाव झालेला नाही. तो कधी आणि कोण करणार याचा खुलासा सहकार खात्याने केलेला नाही. तो लवकरात लवकर करण्याची मागणी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीने केली आहे.
संघर्ष समिती ठेवीदारांच्या पाठीशी
कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याला सर्वप्रथम आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून वाचा फोडली होती. बँकेचे ठेवीदार, खातेदार यांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी या दोन्ही आमदारांनी वेळोवेळी आवाज उठविला. त्याचबरोबर दोषींवर कारवाई व्हावी याकरिता विविध यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर बँकचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील यांना 15 जून रोजी ईडीकडून पनवेलमधील राहत्या घरातून अटक करण्यात आली. सध्या त्यांचा मुक्काम तुरुंगात असून ते वैद्यकीय कारण पुढे करून जामिनासाठी धडपड करीत आहेत. असे असले तरी त्यांच्यासह सर्व दोषींना कठोर शिक्षा होऊन ठेवीदारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याची भूमिका कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीने घेतली आहे.

Check Also

खांदा कॉलनीत महिलांसाठी मॅरेथॉन

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखवला हिरवा झेंडा पनवेल ः रामप्रहर वृत्त स्व. संजय दिनकर भोपी …

Leave a Reply