Breaking News

युरो कप : स्पेन, इटली उपांत्य फेरीत

सेंट पीटर्सबर्ग, म्युनिक ः वृत्तसंस्था
युरो चषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे सामने कमालीचे चुरशीचे झाले. विश्वविजेत्या स्पेनला स्वित्झर्लंडने विजयासाठी झुंजविले, तर दुसरीकडे इटलीने बेल्जियमला पराभूत केले.
पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात स्वित्झर्लंडने तीन वेळा युरो चषक उंचावणार्‍या आणि माजी विश्वविजेत्या स्पेनला विजयासाठी संघर्ष करायला लावला. स्वित्झर्लंडचा गोलरक्षक यान सोमर याची अभेद्य भिंती भेदताना स्पेनच्या स्टार खेळाडूंना घाम गाळावा लागला. 77व्या मिनिटाला एक खेळाडू कमी होऊनही स्वित्झर्लंडने सामना अतिरिक्त 30 मिनिटांपर्यंत खेचला अन् स्पेनला त्यातही झुंजवले. 120 मिनिटांच्या खेळातही 1-1 अशी बरोबरीची कोंडी फुटू शकली नाही. स्पेनला आठव्या मिनिटाला डेनिस झकारीयाच्या स्वयंगोलमुळे आघाडी मिळाली. 68व्या मिनिटाला झेद्रान शकीरीने बरोबरीचा गोल केला. त्यानंतर स्पेनचे खेळाडू प्रचंड तणावात दिसले. 77व्या मिनिटाला रेमो फ्रेलरला लाल कार्ड मिळाला. स्वित्झर्लंडचा गोलरक्षक सोमरने 10 गोल अडवले.
पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनच्या कर्णधार सर्गिओ बुस्क्वेट्सन मारलेला चेंडू गोलखांब्याला लागून माघारी परतला. त्यानंतर स्वित्झर्लंडच्या मारिओ गार्व्हानोव्हीचने गोल करून 1-0 अशी आघाडी घेतली. दानी ओल्मोच्या गोलने स्पेनला बरोबरी मिळवून दिली, पण त्यानंतर स्वित्झर्लंडचे तीन पेनल्टी शूटआऊट निकामी झाले. दोन गोल गोलरक्षक उनाई सिमोनने अडवले, तर एक चेंडू गोलजाळीच्या वरून गेला. गेरार्ड मोरेनो व मायकेल ओयार्झाबाई यांनी गोल करून स्पेनचा विजय पक्का केला.
दुसर्‍या सामन्यात निकोलो बॅरेला (31 मि.) व लोरेंझो इंसिग्ने (44 मि.) यांच्या गोलच्या जोरावर इटलीने 2-1 अशा फरकाने ब्लेजियमला पराभूत केले. रोमेलु लूकाकूने (45+2 मि.) पेनल्टी किकवर गोल केला. इटली व बेल्जियम यांच्यातील सामन्याचा निकाल पहिल्या सत्रातच निश्चित झाला होता, पण विजयानंतर इटलीच्या खेळाडूंनी केलेल्या कृतीची सध्या जोरदार चर्चा आहे. बेल्जियमला पराभूत केल्यानंतर इटलीच्या खेळाडूंनी शॉर्ट्स काढल्या अन् अंडरवियरवर सेलिब्रेशन करू लागले. त्यांच्या या कृतीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply