Breaking News

सिडकोतर्फे विविध 203 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध; सर्वसामान्यांसह विकासकांकरिता सुवर्णसंधी

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा

 सिडको महामंडळातर्फे तीन स्वतंत्र योजनांतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील निवासी आणि निवासी तथा वाणिज्यिक वापराचे तब्बल 203 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले असून सर्वसामान्य नागरिकांसह विकासक व बांधकाम व्यावसायिकांनाही यामुळे सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सदर 203 भूखंडांपैकी पहिल्या योजनेंतर्गत खारघर, कळंबोली आणि नवीन पनवेल (पू.) नोडमधील निवासी तथा वाणिज्यिक वापराचे 12; दुसर्‍या योजनेंतर्गत ऐरोली, घणसोली, खारघर, कळंबोली आणि पनवेल नोडमधील निवासी वापराचे 182 आणि तिसर्‍या योजनेंतर्गत कोपरेखैरणे व नेरूळ नोडमधील निवासी आणि निवासी तथा वाणिज्यिक वापराचे 9 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याद्वारे सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईमध्ये आपले हक्काचे घर साकारण्याबरोबरच बांधकाम व्यावसायिक व गुंतवणूकदारांना नवी मुंबईसारख्या पायाभूत सोयीसुविधांनी परिपूर्ण शहरामध्ये बांधकाम विकसित करण्याची संधी मिळणार आहे.  कोविड महासाथ व टाळेबंदीमुळे बहुतेक सर्व क्षेत्रांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांसह बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळावा याकरिता सिडकोकडून सातत्याने सकारात्मक पावले उचलली जात आहेत. 203 भूखंडांच्या विक्रीच्या योजनेमुळे केवळ बांधकाम क्षेत्राला चालना मिळणार नसून शहराच्या अर्थचक्रासही पुन्हा गती प्राप्त होणार आहे. सिडकोकडून सातत्याने महामंडळाच्या मालकीचे नवी मुंबईतील निवासी, वाणिज्यिक, सामाजिक व सांस्कृतिक उद्देशाकरिता असलेले विविध भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून दिले जातात. यामुळे शहराचा परिपूर्ण विकास साधण्याचे महामंडळाचे उद्दिष्ट साध्य होते. पहिल्या योजनेंतर्गत सिडकोकडून खारघर, कळंबोली व नवीन पनवेल (पू.) नोडमधील एकूण 12 निवासी तथा वाणिज्यिक वापराचे भूखंड उपलब्ध करून देण्यात आले असून 1902.43 चौमी ते 8143.30 चौमीदरम्यानच्या क्षेत्रफळाचे हे भूखंड आहेत. दुसर्‍या योजनेंतर्गत ऐरोली, घणसोली, खारघर, कळंबोली आणि पनवेल नोडमधील मिळून एकूण 182 निवासी भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर भूखंड हे लहान आकाराचे असून 41.41 चौमी ते 391 चौमी. दरम्यानच्या क्षेत्रफळावर नागरिक बंगलो, रो हाऊस व व्हिला साकारू शकतात, तर तिसर्‍या योजनेंतर्गत कोपरखैरणे आणि नेरूळ नोडमधील मिळून 9 निवासी आणि निवासी तथा वाणिज्यिक भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले असून 753.09 चौमी ते 1403.70 चौमी दरम्यानच्या क्षेत्रफळाचे हे भूखंड आहेत. सर्व 203 भूखंड हे किफायतशीर दरात उपलब्ध असून निर्वेध मालकी (क्लिअर टायटल) असणार्‍या या भूखंडांना सिडकोची  हमी आहे. सदर तिन्ही योजना या ई-निविदा व ई-लिलाव पद्धतीने पार पडणार आहेत. या तिन्ही योजनांकरिता निविदाकारांची नोंदणी, अर्ज सादर करणे, अनामत रकमेचा भरणा करणे, बंद निविदा सादर करणे, ई-लिलाव प्रक्रिया व योजना पुस्तिका इत्यादी सर्व तपशील सिडकोच्या हीींिीं://शर्रीलींळेप.लळवलेळपवळर.लेा या ई-लिलाव संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. उपनगरी रेल्वे, महामार्ग व अंतर्गत रस्त्यांचे जाळे यामुळे नवी मुंबईला उत्तम संधानता (कनेक्टिव्हिटी) लाभली आहे. नजीकच्या काळात साकार होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे नवी मुंबई थेट जगाला जोडली जाणार आहे. तसेच सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे सार्वजनिक परिवहन सेवा अधिक सक्षम होणार आहे. नियोजित कॉर्पोरेट पार्क प्रकल्पामुळे शहराच्या वाणिज्यिक क्षमता मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत होणार आहेत. या तिन्ही योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर निवासी आणि निवासी तथा वाणिज्यिक भूखंड उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेकांचे नवी मुंबईमध्ये आपले मनपसंत घर साकारण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे वाणिज्यिक बांधकामांमुळे शहराच्या विकासासही चालना मिळणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply