Breaking News

गृहसंकुलांत कोरोनाचा वाढता प्रसार; नवी मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रांत वाढ

नवी मुंबई ः प्रतिनिधी

नवी मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रांतही वाढ झाली आहे. एकूण 1159 प्रतिबंधित क्षेत्र असून त्यात 913 गृहसंकुलांचा, तर 245 रो हाऊसचा समावेश आहे. गावठाण व झोपडपट्टी भागात फक्त एक प्रतिबंधित क्षेत्र आहे. यावरून गृहसंकुलांत कोरोना संसर्ग अधिक असल्याचे दिसते, मात्र यात एकही अतिसंक्रमित (हॉटस्पॉट) नाही. नवी मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना दैनंदिन रुग्णसंख्या 50पेक्षा कमी झाली होती, मात्र कोरोना निर्बंध उठविण्यात आल्यानंतर पुन्हा रुग्णवाढ होत ही संख्या दीडशेपर्यंत गेली होती. तिसर्‍या लाटेची शक्यता पाहता प्रशासनाने रुग्णवाढीवर प्रतिबंध घालण्यासाठी काही निर्बंध लागू करीत शहरासाठी नियमावली जारी केली होती. यात प्रशासनाने अतिसंक्रमित होणार्‍या सोसायट्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. वारंवार रुग्ण आढळल्यास अशा सोसायट्या हॉटस्पॉट म्हणून घोषित केल्या जाणार आहेत. या सोसायट्यांमधील सर्वांचीच कोरोना चाचणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे या सोसायटीमधून नागरिकांना बाहेर जाता येणार नाही व बाहेरून कोणाला प्रवेशही करता येणार नाही. याबाबत संबंधित सोसायट्यांनी प्रतिबंध घालावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या सोसायट्यांनी नियमांचा भंग केल्यास पहिल्या वेळेस 10 हजार, दुसर्‍या वेळेस 25 हजार व तिसर्‍या वेळेपासून प्रत्येक वेळी 50 हजारांचा दंड करण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने शहरातील प्रतिबंधित क्षेत्र करताना त्यांचे तीन भाग केले आहेत. यात लहान प्रतिबंधित क्षेत्र सोसायट्यांमध्ये, तर दुसर्‍या टप्प्यात शहरातील रो हाऊस तसेच तिसर्‍या टप्प्यात गावठाण व झोपडपट्टी आणि विभागाचा अंतर्भाव केला आहे. शहरात सध्या एकूण 1159 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. यात 913 लहान प्रतिबंधित क्षेत्र असून ती सोसायट्यांमध्ये आहेत. रो हाऊसमध्ये 245 प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. यात त्या सोसायटीतील एक किंवा दोन घरांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास पालिका कडक निर्बंधांसह दंडात्मक कारवाईही करणार आहे, मात्र अद्याप तशी परिस्थिती एकाही सोसायटीत नाही. गृहसंकुले किंवा रो हाऊसमध्ये प्रतिबंधित क्षेत्रे वाढत आहेत, मात्र दिलासादायक बाब म्हणजे गावठाण व झोपडपट्टी भागात फक्त एकच प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामुळे या भागात संसर्ग कमी असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करताना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या शोधमोहिमेवर अधिक भर दिल्याने अद्याप तरी शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी कोरोना प्रादुर्भाव कमी असल्याची माहिती प्रशासनाने दिली. कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत 65,937 नागरिक व आस्थापनांवर कारवाई करीत तीन कोटी दोन लाख 80 हजार 650 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply