शेकाप नगरसेविकेने अतिउत्साहाने टाकले कोनशिलेवर नाव
पनवेल ः प्रतिनिधी
कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये असलेले बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांनी पनवेल तालुक्यातील पाले खुर्द येथील कार्यक्रमाला उपस्थिती कशी लावू शकतात, असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे. शेकापच्या नगरसेविका अरुणा किरण दाभणे यांनी तशी नोंद कार्यक्रमाच्या कोनशिलेवर केल्याने कर्नाळा बँकेचे खातेदार आणि ठेवीदारांनाही आश्चर्य वाटत आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील पाले खुर्द येथील शाळेच्या नूतन इमारतीचे बांधकाम युनायटेड ब्रेवरीज कंपनीच्या सीएसआर फंडातून करण्यात आले आहे. या इमारतीचे उद्घाटन आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते व बॉम्बे ब्रेवरीजचे क्लस्टर हेड माणिक चोप्रा यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 7) झाले. या कार्यक्रमाच्या कोनशिला फलकावर शेकापच्या नगरसेविका अरुणा दाभणे यांनी उपस्थितांमध्ये पहिलेच नाव चक्क माजी आमदार विवेकानंद पाटील यांचे लिहिले आहे.
कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने विवेक पाटील यांना अटक केलेली आहे. सध्या त्यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये असताना ते पाले खुर्द येथील कार्यक्रमाला कसे उपस्थित राहतील, असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे. महाविकास आघाडी सरकारने त्यांना उपस्थित राहण्यासाठी विशेष सवलत तर दिली नाही, ना अशी चर्चाही ठेवीदारांमध्ये सुरू होती.
दरम्यान, आपल्या नेत्याच्या ‘कर्तृत्वा’मुळे आपल्याच पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांसह अनेक गोरगरीब नागरिकांचे आयुष्य, संसार उद्ध्वस्त झाले आणि त्यामुळे सध्या हा नेता जेलमध्ये आहे, याचेही भानही शेकापच्या नगरसेविकेला नसावे याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
कर्नाळा बँक कशी बुडाली हे फलकावर कोरण्याची हिंमत शेकाप पुढारी दाखवतील का?
ठेवीदारांचा शेकापवाल्यांना सवाल शेकडो कोटींचा घोटाळा करून पैसे गिळंकृत करणार्या विवेक पाटलांचे नाव तुम्ही कार्यक्रमाच्या उपस्थितांमध्ये देता, तर कधी बॅनर लावून त्यांना शुभेच्छा देता. एवढीच जर आपल्या घोटाळेबाज पुढार्याची वाहवा करीत असाल तर मग ज्यांचे पैसे बँकेत अडकले आहेत त्या ठेवीदारांच्या प्रती थोडी तरी दया असल्यास त्यांचे पैसे विवेक पाटलांनी परत करावे असा एखादा बॅनर लावा. नाही तर आजच्या कार्यक्रमात विवेक पाटील यांची उपस्थिती मान्यवर म्हणून जशी दर्शविण्यात आली तशाच प्रकारे कर्नाळा बँक विवेक पाटील यांच्यामुळे कशी बुडाली हे फलकावर कोरण्याची हिंमत शेकाप पुढारी दाखवतील का, असा सवाल ठेवीदार, खातेदार करीत आहेत.