सरपंच, ग्रामसेवकांच्या चौकशी व निलंबनाची मागणी
म्हसळा : प्रतिनिधी
तालुक्यातील घोणसे ग्रामपंचायतीच्या बहुतांश आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता असल्याचे दिसत असून, सरपंच व ग्रामसेवक यांची चौकशी आणि निलंबीत करावे, अशी मागणी माहिती आधिकार कार्यकर्ते योगेश महागावकर व ग्रामस्थांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
म्हसळा तालुक्यातील घोणसे ग्रुपग्रामपंचायतीत म्हशाचीवाडी, वडाचीवाडी, केळेवाडी, निवाचीवाडी, बौध्दवाडी, कानसेवाडी अशा वाड्या असून सरपंच या कधीच ग्रामपंचायत कार्यालयात येत नाहीत, अशीही तक्रार आहे. ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक वाडीवरील विकासकामांच्या आर्थिक व्यवहारात सरपंच व ग्रामसेवक निलम सुतार यांची मिलीभगत असल्याचे माहिती आधिकारात स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायतीला लागणारे हार्डवेअरपासून सॅनिटायझरपर्यंतचे सर्व सामान एसजीएम इंटरप्रायझेस दिवा (ठाणे) यांच्याकडून खरेदी केले जाते, असे स्पष्ट झाले आहे.
घोणसे ग्रामपंचायतीमध्ये खालील कामामध्ये अनियमितता व आर्थिक घोटाळा असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत 1) कृषी अवजारांचे वाटप रू 49,998 (किरकोळ वाटप करून अपहरण) 2) ग्रामस्थांना सॅनिटायझरचे वाटप रु 78,750 (नॉट फॉर सेलच्या जेलचे वाटप करून सॅनिटायझर वाटपाच्या रक्कमेचा अपहार), 3) घोणसे विहीर साफसफाई रु. 33 हजार (डाटा एंट्री ऑपरेटरच्या नावे रक्कम काढून अपहार), 4) मागासवर्गीय व दिव्यांग निधी वाटप (आर्थिक अनियमितता), 5) विचारेवाडी विहीर डागडुजी रु. 47 हजार (10-12 चिर्याना पॉईंटींग व जाळी सुमारे खर्च पाच ते सहा हजार उर्वरीत आर्थिक अपहार), 6) शेतकरी आभ्यास दौरा रु. 10 हजार, 7) प्राथमिक शाळा प्रोजेक्टर 43,820 आणि संगणक खरेदी रु. 33 हजार (बाजार भावापेक्षा जास्त).
घोणसे ग्रामपंचायतीत सरपंच रेश्मा कानसे व ग्रामसेवक निलम सुतार यांनी संगनमताने केलेल्या या गैरव्यवहाराची तात्काळ चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, ग्रामसेवक सुतार यांना निलंबित करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
घोणसे ग्रामसेवक निलम सुतार यांच्याकडे तालुक्यातील खामगाव ग्रामपंचायतीचासुद्धा कार्यभार आहे. त्या ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
घोणसे ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक निलम सुतार यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत तक्रार आली आहे, चौकशी सुरु आहे.
-सुनिल गायकवाड, विस्तार आधिकारी . पंचायत समिती म्हसळा