Breaking News

मोरबे धरणग्रस्त आक्रमक; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; आंदोलनाचा इशारा

मोहोपाडा : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील चौक येथील मोरबे धरणग्रस्त जनतेचे प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक वेळा समस्या मांडूनही न्याय व सुविधा मिळत नसल्याने आता मोरबे धरणगस्त बांधव आता आक्रमक झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर समस्या सोडविल्या नाहीत तर राज्य शासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्याचे मृख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. चौक मोरबे धरणग्रस्तांकडे राज्य शासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे, असे मोरबे धरण कृती समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणारे धरण खालापूर तालुक्यातील चौक मोरबे येथे असून, कवडीमोल किमतीने शासनाने जमिनी संपादन केल्या असून पर्यायी जमीन, नोकरी, योग्य मोबदला, नागरी सुविधा अद्यापही दिल्या नाहीत. नवी मुंबई महानगरपालिका यांनी नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी मंजूर केलेला कोटींचा निधी चार वर्षे झाली तरी चौक मोर्बे धरणग्रस्त जनतेच्या वसाहतीपर्यंत पोहचला नाही, असे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. संपूर्ण नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणार्‍या धरणग्रस्तांनाच पाणी मिळत नाही. यासाठी धरणग्रस्तांच्या वतीने अनेक मोर्चे, आंदोलने झाली, अनेक बैठका मंत्री महोदय, वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका यांच्या समवेत झाल्या आहेत. असे असले तरी न्याय मिळत नसेल, तर आम्ही कुणाकडे जायचे असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे. आठ महसुली गावे व वाड्या-पाड्या यांचे स्थलांतर झाले, तर काही आदिवासीवाड्या आजही दुर्गम भागात आहेत. त्यांचे भूसंपादन झाल्याने ते पुनर्वसनच्या कुठल्याच नकाशावर नाहीत, असे त्यांनी खेदाने सांगितले. तर यातही कोयना प्रकल्पग्रस्त यांची वसाहत असून कोयना प्रकल्पग्रस्त जनतेला अद्यापही न्याय न मिळाल्याने या वसाहतीवरही अन्याय झाला आहे. येत्या काळात आमच्या समस्यांकडे राज्य सरकारने लक्ष केंद्रित न केल्यास समस्या सुटेपर्यंत आंदोलन केले जाईल, असा इशाराही जगन्नाथ पाटील यांनी समितीच्या वतीने दिला आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply