Breaking News

बार्टी, प्लिस्कोव्हा अंतिम फेरीत

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा

लंडन ः वृत्तसंस्था
अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टी हिने 2018च्या विजेत्या अँजेलिक केर्बर हिचा सरळ सेटमध्ये पाडाव करीत विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरीत मजल मारली आहे, तर आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिने दुसर्‍या मानांकित आर्यना सबालेंका हिचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव करीत दुसर्‍यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
बार्टीची मार्गदर्शक इव्होनी कावली यांनी 1980मध्ये दुसर्‍या विम्बल्डन जेतेपदावर नाव कोरले होते. त्यानंतर विम्बल्डची अंतिम फेरी गाठणारी 25 वर्षीय बार्टी ऑस्ट्रेलियाची पहिली महिला टेनिसपटू ठरली आहे. बार्टीने केर्बरचा 6-3, 7-6 (7/3) असा पराभव केला. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर बार्टीला दुसर्‍या सेटमध्ये केर्बरच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागले होते. केर्बरने दुसर्‍या सेटमध्ये 5-2 अशी आघाडी घेतली होती, पण बार्टीने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करीत टायब्रेकमध्ये हा सेट जिंकला. आता बार्टीला अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाशी लढत द्यावी लागेल.
दुसर्‍या उपांत्य लढतीत प्लिस्कोव्हाने बेलारूसच्या सबालेंकाला 5-7, 6-4, 6-4 असे हरवले. पहिल्या सेटमध्ये दोघींनीही तोडीस तोड खेळ करीत 5-5 अशी बरोबरी साधली. त्यानंतर सबालेंकाने प्लिस्कोव्हाची सर्व्हिस भेदत पहिला सेट आपल्या नावावर केला. दुसर्‍या सेटमध्ये जोमाने पुनरागमन करीत प्लिस्कोव्हाने 4-2 अशी आघाडी घेत सामन्यात बरोबरी साधली. तिसर्‍या सेटमध्येही दमदार खेळ करत प्लिस्कोव्हाने प्रथमच विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली.
दरम्यान, मानसिक नैराश्येमुळे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर जपानच्या नाओमी ओसाकाला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल, अग्रमानांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच, जलतरणपटू मायकेल फेल्प्स तसेच अमेरिकेचा बास्केटबॉलपटू स्टीफन करी यांचा पाठिंबा लाभला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply