अलिबाग : प्रकाश सोनवडेकर
मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. रायगड जिल्ह्यातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढला. शुक्रवार (दि. 23)पर्यंत एकूण 52 हजार 932 रुग्ण आढळले. असे असले तरी मार्च ते ऑक्टोबर या आठ महिन्यांच्या कालावधीत कोविड-19 विषाणू जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतींमध्ये शिरकाव करू शकलेला नाही, तर जिल्ह्यातील 247 ग्रामपंचायतींमध्ये पाचपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. मंबईपासून जवळ असल्याने रायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतील अशी भीती सुरुवातीला व्यक्त केली जात होती. टाळेबंदी (लॉकडाऊन)च्या काळात मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरांमधून लोक रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी आले. त्यानंतर गणेशोत्सावातही मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आले. या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील कोरोना रुग्णांची संख्या वाढली, मृतांचाही आकडा वाढला. कोरोना महामारीचा प्रकोप वाढल्याने शासनाने जिल्ह्यात सुविधा वाढविल्या. कोरोना चाचणी केंद्र सुरू केले. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या. अखेर मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात रुग्णांच्या संख्या घट होऊ लागली आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांनी 50 हजारांचा आकडा गाठला आहे. असे असले तरी या कालावधीत जिल्ह्यातील 811 पैकी 72 ग्रामपंचायतींची हद्द कोविड-19चा विषाणू ओलांडू शकलेला नाही. या ग्रामपंचायत हद्दीत अद्याप एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. महाड तालुक्यात तब्बल 27 ग्रामपंचायतींमध्ये कोरोनाच्या एकाही रुग्णाची नोंद नाही. त्याखालोखाल पोलादपूर व म्हसळा प्रत्येकी 10, श्रीवर्धन नऊ, सुधागड सात, कर्जत तीन, मुरूड व माणगाव प्रत्येकी दोन आणि खालापूर व पेण तालुक्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायतीचा समावेश आहे, तर 247 ग्रामपंचायतींमध्ये पाचपेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळले.
जिल्ह्यात 72 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील एकाही ग्रामस्थाला आतापर्यंत कोरोनाची लागण झालेली नाही. ही एक आनंदाची बाब आहे. जिल्ह्यात कोविड-19 आटोक्यात येत आहे. तरीही सण-उत्सव काळात नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणेपालन करून काळजी घ्यावी.
-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड