केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पुनरूच्चार
भिवंडी ः प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा पाटील यांचे नाव द्यावे, अशी स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे. या मागणीचा आणि भूमिपुत्रांच्या भावनांचा आदर केला गेलाच पाहिजे, असे नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
स्थानिकांना विश्वासात न घेता तसेच लोकभावनेचा अनादर करून नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे, मात्र त्यास भूमिपुत्रांचा विरोध होत असून या विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची मागणी होत आहे. यासाठी भूमिपुत्रांकडून आधी भव्य मानवी साखळी आणि त्यानंतर विराट सिडको घेराव आंदोलन करण्यात आले. या मागणीकडे यापूर्वी कपिल पाटील यांनी संसदेत सभागृहाचे लक्ष वेधले होते. आता केंद्रीय राज्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी आपल्या मागणीचा पुनरूच्चार केला आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाकडे माझे लक्ष असेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मंत्री पाटील यांनी या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत विश्वासाने दिलेल्या केंद्रीय मंत्रिपदाद्वारे मी देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त योगदान देईन. माझी जन्मभूमी असलेल्या भिवंडीसह ठाण्यातील विकासकामांकडेही लक्ष देणार आहे, असे सांगितले.