पनवेल : प्रतिनिधी
दिल्ली-एर्नाकूलम मंगला विशेष प्रवासी एक्सप्रेस मधून अमली पदार्थांची वाहतूक करणार्या एका नायजेरियन नागरिकाला रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. दिल्ली-एर्नाकूलम मंगला विशेष प्रवासी एक्सप्रेस या गाडीची निळजे आणि तळोजा स्टेशन दरम्यान साखळी ओढून गाडी थांबवली जात असल्याच्या तक्रारी आरपीएफकडे आल्या होत्या. त्यानंतर या गाडीवर आरपीएफ कर्मचार्यांनी गस्त वाढवली. मंगळवारी अशाचप्रकारे वातानुकूलित थ्री टायर डब्यातून एका नायजेरियन नागरिकाने डब्यातील आपत्कालिन साखळी खेचून गाडी थांबवली व तो पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना आरपीएफ आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचार्यांनी त्याला पकडले. नयाजेरियन नागरिक सनी ओचा आयके याच्या जवळील बॅगेत 2.3 किलो वजनाचे अम्फॅटामाईन्स आढळले. त्यांची बाजारात किंमत दोन कोटी रुपये आहे. एनडीपिएस (नारकोटिक्स ड्रग्स अन्ड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस) कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper