Breaking News

तौक्ते चक्रीवादळग्रस्त अद्यापही मदतीविना

राज्य शासनाने सोडले वार्‍यावर; नुकसानभरपाई न मिळाल्याने श्रीवर्धनकर नाराज

श्रीवर्धन ः प्रतिनिधी
तौक्ते चक्रीवादळ होऊन दोन महिने होत आले तरीही श्रीवर्धनमधील वादळग्रस्तांना राज्य शासनाकडून अद्याप कोणतीही मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे वादळात नुकसान झालेल्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
कोकण किनारपट्टीला 16 व 17 मे रोजी तौक्ते चक्रीवादळाने झोडपून काढले होते. या वादळात विशेषतः घरे, फळझाडे, गुरांचे गोठे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे वादळ मागील वर्षी 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाएवढे महासंहारक नसले तरीही त्याचा वेग जोरदार असल्याने कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी नुकसान झाले. श्रीवर्धन व हरिहरेश्वरच्या समुद्रकिनार्‍यावरही हे वादळ धडकून परिसराला फटका बसला होता.
तौक्ते वादळानंतर राज्याचे आपत्ती निवारण, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी श्रीवर्धन तालुक्यातील वादळग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर श्रीवर्धन प्रांत कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेऊन उपस्थित अधिकार्‍यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करून ते शासनाकडे सादर करावेत, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनीदेखील श्रीवर्धन तालुक्याचा दौरा केला होता, मात्र दोन महिने होत आले तरीही अद्याप कोणत्याही प्रकारची मदत एकाही वादळग्रस्ताला मिळालेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने वादळग्रस्तांना वाटाण्याच्या अक्षता लावल्याची भावना व्यक्त होत आहे.
कोरोना महामारीत सतत होणारे लॉकडाऊन व त्यामुळे आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होत असतानाही राज्य शासनाकडून वेळेवर मदत मिळत नसल्याने वादळग्रस्तांमधून नाराजी व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमच्याकडे लक्ष देतील का, असा सवालही वादळग्रस्त नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply