Breaking News

विरोधकांनी विकासकामांकडे डोळसपणे पहावे

उमेदवार श्रीरंग बारणे यांचा जोरदार प्रहार

कर्जत : विजय मांडे

 ’मी गेल्या पाच वर्षात मावळ लोकसभा मतदार संघात विकास कामे केल्यानेच सहाही विधानसभा मतदारसंघातील जनतेशी जोडला गेलेलो आहे. लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणारा खासदार म्हणून माझी गणना केली जाते. अनेक विकास कामे मी केली आहेत. परंतु भ्रष्टाचाराची पट्टी डोळ्यावर ओढली असल्यामुळे विरोधकांना  मी केलेली विकास कामे दिसत नसावीत. राज्यात व देशात प्रचंड भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांना सत्तेतून पाय उतार व्हावे लागले.’  असे सडेतोड उत्तर मावळ मतदार संघातील शिवसेना – भारतीय जनता पार्टी – आरपीआय महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी रामप्रहरला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान दिले आहे.

खासदार श्रीरंग बारणे कर्जत तालुक्याच्या प्रचार दौर्‍यावर आले होते. त्यावेळी बिनधास्तपणे उत्तर देताना त्यांनी ’मावळ लोकसभा मतदार संघात मी गेली पाच वर्षे विकास कामांसाठी झटत होतो इतकेच नव्हे तर मतदार संघातील सामान्य माणसाच्या सुखदु:खात सुद्धा उपस्थित राहात होतो. या मतदार संघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत तर पुणे जिल्ह्यातील  मावळ, पिंपरी आणि चिंचवड या तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. दोन्ही भागातील प्रश्न वेगळे आहेत. परंतु त्या प्रश्नांचा अभ्यास करून ते सोडविण्यासाठी मी लोकसभेत प्रश्न मांडले आणि ते सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केले. लोकसभेत मला पाचही वर्ष ’संसद रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. हे सारे श्रेय मला निवडून दिलेल्या मतदारांचे आहे.’

आपण काहीच विकास कामे केली नाहीत असे विरोधक म्हणतात यावर तुमचे म्हणणे काय? याप्रश्नाला उत्तर देताना बारणे यांनी,  ’रेल्वेच्या तिसर्‍या-चौथ्या लाईनची मंजुरी घेण्याचे महत्वपूर्ण काम केले. त्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले त्याचा डीपीआर घेतला आहे.  कर्जत – पनवेल शटल सेवा सुरू केली आहे. कर्जत – पनवेल लोकल सेवा व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. कर्जत या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर काही एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा असावा यासाठी प्रयत्न केले. माथेरानची मिनीट्रेन बंद होती ती पुन्हा सुरू करण्यात यश आले. केंद्र सरकारच्या माध्यमातून पनवेल ते जेएनपीटी  उरण रस्ता, कर्जत – मुरबाड रस्त्यावरून भीमाशंकरला जोडणार्‍या रस्त्याला मंजुरी घेतली आहे.त्यामुळे घाट सेक्शन कमी होईल. तीस किलो मीटरचे अंतर कमी होईल. वेळ वाचेल. असेही त्यांनी सांगितले. खांडस परिसरातील तुंगी या दुर्गम गावात वीज नव्हती.तेथे दोन वर्षापूर्वी वीज पुरवठा सुरु करण्यात मी यशस्वी झालो,असेही बारणे यांनी सुचित केले. 

’पिंपरीला पासपोर्ट कार्यालय सुरू केले. तेथे सर्वात जास्त पासपोर्ट काढले जात आहेत. पनवेलला सुद्धा भविष्यात  पासपोर्ट कार्यालय होईल. त्यासाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून एच आय एल सारख्या  कारखान्याला शंभर कोटी रुपये देण्याचे काम केले आहे. मावळ मधील शेतकर्‍यांच्या सात बारा उतारीवरील एमआयडीसीचे शिक्के

काढण्याचे काम केले त्यामुळे 732 हेक्टर जमीन वगळण्यात आल्याने   शेतकर्‍यांना न्याय देण्याची भूमिका या सरकारने घेतली आहे. विकासाची कामे करीत आहे म्हणून जनतेशी जोडला गेलेलो आहे. एकरूप झालेलो आहे. मात्र विरोधकांच्या डोळ्यावर भ्रष्टाचाराची पट्टी ओढली असल्याने त्यांना ते दिसत नाही.  विकासाचा  मुद्दा घेऊनच मी निवडणुकीला सामोरे जात आहे. समोर कोण आहे आणि कशा पद्धतीने प्रचार करतात याचा विचार मी करीत नाही. या मतदार संघातील जनता अत्यंत सुज्ञ आहे. ते योग्य तो निर्णय घेतीलच. असे सांगितले.

      आपण पुन्हा खासदार झाल्यास मतदार संघात कोणती विकास कामे करणार? या प्रश्नावर त्यांनी, ’या मतदार संघात रेल्वेची अनेक कामे प्रलंबित आहेत.माझ्या अजेंड्यावर असलेली त्याबाबतची कामे करण्याचा मी प्रयत्न करीन. पनवेल येथील नवीन विमानतळाचा प्रश्न आहे. सातत्याने त्याचा पाठपुरावा सुरू आहे. तेथील शेतकर्‍यांचे प्रश्न आहे त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. त्याभागातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे  पिंपरी – चिंचवड सारख्या शहरात पाणी पुरवठ्याची समस्या गभीर भेडसावत आहे. मी लोकसहभातून पवना धरणातून तीन वर्षे गाळ  काढला आहे. आंध्र धरणातून या शहरांना पाणी मिळावे म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडे पाठपुरावा करून सर्वाधिक निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय.    ’ मावळ, पिंपरी, चिंचवड, कर्जत, पनवेल, उरण या विधानसभा मतदार संघातील प्रलंबित असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांसाठी पाठपुरावा करणार आहे. अंतिम  प्रचारासाठी केंद्र व राज्य सरकारातील मंत्री, पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे,  युवासेना प्रमुख आदित्य  ठाकरे आदींच्या सभा होतील. निवडणुकीत प्रचार सभा हा एक भाग आहे. मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवीत आहे. माझ्या समोर असलेला उमेदवाराची ओळखही नाही. तो उमेदवार अपरिचित आहे.  या मतदार संघात काम करणार्‍याच्या मागे जनता उभी राहते. त्याचा प्रत्यय तुम्हाला निवडणुकीच्या निकालाच्या वेळी येईलच.’ असे बारणे यांनी शेवटी ठामपणे सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply