दोघांना अटक; एक फरारी
उरण : प्रतिनिधी
उरण पोलिसांनी चारफाटा छापा टाकून सहा किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. एक लाख 20 हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ असलेला गांजा बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आली.
येथील रहिवासी असलेले प्रितम प्रभाकर नायर (वय 26, रा. डाऊरनगर चर्चजवळ) व राहूल केशव धुमाळ (वय 26, रा. डाऊरनगर) या दोघांवर गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क),20(ब) कारवाई करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाल्यानंतर गुरुवारी (दि. 15) उरण चारफाटा येथील बिन्नी गॅरेजजवळ सापळा रचून दोघेजण संशयास्पदरित्या वावरताना आढळल्याने त्यांची झडती घेतली. या वेळी त्यांच्याजवळ प्रत्येकी एक किलोप्रमाणे निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत तीन पॅकेटमध्ये एकत्र केलेला पाने, फुले, काड्या, बिया असा उग्र वासाचा ओलसर सहा किलो वजनाचा गांजा (अमली पदार्थ) आढळून आला.
या प्रकरणातील विशाल श्रावण पायरे (वय 19) हा आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक निरीक्षक तुकाराम निंबाळकर, उपनिरीक्षक सचिन वायकर, पोलीस कर्मचार्यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे उरण परिसरात गुप्तपणे अमली पदार्थ विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.