Breaking News

अभिमान आणि आनंद

व्यापक लसीकरणाच्या संरक्षणामुळे आगामी काळात कोरोना महासाथीची तीव्रता कमी होत जाईल व जगणे पुन्हा एकदा वेग घेईल अशा आशेसह दैनिक राम प्रहरच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त सद्यस्थितीचा आढावा घेणारा लेख.

दैनिक राम प्रहरचा आज 13वा वर्धापन दिन. गेली जवळपास दीड वर्षे आपल्या सगळ्यांच्याच जीवनातील बहुतेक सर्व बाबींवर कोरोनाच्या महासाथीचे सावट आहे. त्यामुळे उत्साहाने वर्धापन दिन साजरा करीत नसलो तरी दैनिक राम प्रहरने 13 वर्षे पूर्ण केल्याचा आनंद आणि अभिमान निश्चितच आहे. कोरोना महासाथीच्या परिणामांची झळ अवघ्या जगाला पोहचली आहे. आपला देश आणि महाराष्ट्र राज्य कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेतून नुकते कुठे सावरत असतानाच जगातील काही देश तिसर्‍या लाटेचा सामना करीत आहेत. त्यामुळेच आपल्याकडे जनजीवन पूर्ववत होऊ लागल्याने हायसे वाटत असतानाच तिसर्‍या लाटेच्या शक्यतेने साशंकताही आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आपल्या अफाट लोकसंख्येच्या देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण हळूहळू वेग घेत आहे. लसीकरणाच्या संरक्षणामुळे येत्या काळात कोरोना संसर्गाची किमान तीव्रता कमी होईल अशी आशा अगदी तज्ज्ञमंडळीही बाळगून आहेत. सर्वसामान्य तर अद्यापही संभ्रमावस्थेतच आहेत. अशा प्रकारची जागतिक महामारी यापूर्वी कधीही न अनुभवल्याने काय खरे अन् काय खोटे मानावे अशा मानसिक स्थितीत आपल्यापैकी बहुतेक जण आहेत. ज्यांनी कोरोनामुळे घरातील, कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना गमावले आहे त्यांची अवस्था तर त्याहूनही बिकट आहे. महामारीला अटकाव करण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यावाचून सरकारी यंत्रणांकडे पर्याय नव्हता. याचा मोठा आर्थिक फटका अनेक क्षेत्रांतील नोकरदार, व्यावसायिक यांना बसला आहे. अवतीभवतीचे हे वास्तव, अद्यापही तितकीच गडद असणारी अनिश्चितता आपल्या सगळ्यांच्याच मानसिक स्वास्थ्यावर कमीअधिक प्रमाणात परिणाम करीत आहे, परंतु या सार्‍या आव्हानात्मक परिस्थितीतही आपण सारेच एका विजिगीषू वृत्तीने जगणे रेटत आहोत. छोट्या-छोट्या गोष्टींमधून आनंदाचे कण वेचत आहोत. बदललेल्या जीवनशैलीचा प्रसन्न, सकारात्मक वृत्तीने स्वीकार करीत आहोत हेही मनाला खूप मोठी उभारी देणारे आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात आपल्या सगळ्यांच्याच जगण्याचा पोत मोठ्या प्रमाणात बदलला आहे. परस्परांशी प्रत्यक्ष संपर्क बर्‍याच प्रमाणात कमी झाला असल्यानेच की काय संपर्कात राहण्याची ओढ मात्र वाढली आहे. घराबाहेरचे जगणे बर्‍याच प्रमाणात मर्यादित झाल्याने कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत झाला आहे. अनेक अनावश्यक बाबी व त्यावरील वेळ व पैशांचा अपव्यय यांना परस्परच चाट मिळाली आहे. शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सारेकाही ऑनलाइन होऊन गेल्यामुळे अनेकांच्या आयुष्यातील रोजच्या प्रवासाची दगदग व संबंधित ताण वजा झाला आहे. अर्थात थोड्याफार प्रमाणात या प्रवासाची उणीवही काही जणांना भासत आहे. वर्क फ्रॉम होमशी कर्मचारी आणि कंपन्या या दोघांनीही एव्हाना जुळवून घेतले आहे आणि तितकासा हा पर्याय वाईट नाही याची जाणीव सर्व स्तरावर होऊ लागली आहे. कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात, तशा त्या ऑनलाइन-ऑफलाइन या दोहोंनाही आहेतच. या दोन्ही बाजूंचा लेखाजोखा मांडूनच महामारीनंतरच्या काळात जगणे आकार घेईल अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत. शाळा-विद्यापीठे हायब्रिड क्लासेस अर्थात ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षणाचा सुयोग्य मेळ घालून पुढील वाटचाल करण्याची आखणी करू लागली आहेत. परस्पर संपर्काची सर्वाधिक ओढ दिसून येते ती शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थीवर्गामध्ये. शिक्षणाच्या प्रक्रियेत या परस्पर संपर्कातूनही जगण्याचे अनेक धडे आपण आपोआप शिकत जात असतो. त्यामुळेच ही किशोरवयीन-तरुण पिढी समाजमाध्यमांवरील नवनवीन मंचांवरून परस्पर संपर्क प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. इंटरनेटचे जाळे जिथे जिथे पोहचले आहे मग महानगरांपासून ते छोट्या शहरांपर्यंत आणि काही प्रमाणात ग्रामीण भागातील तरुणही यात मागे नाहीत असे दिसत आहे. अर्थात महामारीची लाट ओसरू लागताच पुन्हा एकदा कोरोनापूर्व काळाप्रमाणे जगणे अनुभवण्याचा जोशही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संचारतो. अलीकडच्या काळात पर्यटनस्थळी दिसणारी गर्दी ही त्याचेच द्योतक आहे. साध्या दुकानदारापासून मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या विकासकापर्यंत ग्राहकाचे अतिशय अगत्याने स्वागत केले जाताना दिसत आहे. जगण्याने पुन्हा एकदा पूर्वीसारखा वेग घ्यावा ही आस प्रत्येकाच्याच मनात आहे आणि तसे करताना गेल्या दीड वर्षाच्या काळात मिळालेली शहाणपणाची जाणीव अनेकांना कायमस्वरूपी जोपासायची आहे. या वातावरणात दैनिक राम प्रहरचा वर्धापन दिन कोणत्याही सोहळ्याशिवाय साधेपणाने साजरा होत आहे. मल्हार नेटवर्क प्रा. लिमिटेडमध्ये मल्हार टीव्ही आणि दैनिक राम प्रहर या दोहोंचा समावेश होतो. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 2 जुलै 2006 रोजी चॅनेल वन या नावाने या टीव्ही चॅनेलची सुरुवात झाली. 2013 साली त्याचे नाव बदलून मल्हार टीव्ही असे करण्यात आले. तत्पूर्वी 18 जुलै 2008 रोजी राम प्रहर या दैनिकाचा जन्म झाला. राम प्रहरच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाच्या भव्यदिव्य दीक्षांत सभागृहात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्या सोहळ्यास देशमुख यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सचिन पाटील, मदन बडगुजर, एस. एम. देशमुख यांनी या वृत्तपत्राची धुरा यापूर्वी सांभाळली आहे. मल्हार नेटवर्कचा घटक असलेली ही दोन्ही माध्यमे आज नवी दिशा, नवा ध्यास घेऊन कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यातील नामांकित चॅनेल म्हणून मल्हार टीव्ही, तर अग्रेसर वृत्तपत्र म्हणून दैनिक राम प्रहर प्रेक्षक आणि वाचकांच्या पसंतीस उतरत आहेत. मल्हार नेटवर्कचे आधारस्तंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मार्गदर्शक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यशैलीनुसार सर्वसामान्य माणसालाच केंद्रबिंदू मानून मल्हार टीव्ही व दैनिक राम प्रहरची आजवरची वाटचाल राहिली आहे. बदलत्या काळानुसार या परिवारात वेब पेज व अ‍ॅपही सहभागी झाली आहेत. मल्हार टीव्हीनेही यू ट्यूब व फेसबुकवर पाय रोवले आहेत. प्रेक्षक-वाचकांशी जुळलेले घनिष्ठ ऋणानुबंध जोपासत या दोन्ही माध्यमांची वाटचाल सुरू आहे. अर्थातच या वाटचालीत आमचे जाहिरातदार, वितरक यांचाही मोलाचा वाटा आहे. यापुढील वाटचालीतही आपणा सार्‍यांचे सहकार्य असेच मिळत राहील. लोभ आहेच, तो वृद्धिंगत होईल अशा आशेसह वाचक, वितरक, जाहिरातदार आदी सर्वांना राम प्रहरच्या वर्धापन दिनानिमित्त अनेकानेक शुभेच्छा.

-देवदास मटाले, मुख्य संपादक, दै. राम प्रहर

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply