दुसर्या सराव सामन्यात घेणार भाग
लंडन ः वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने कोरोनावर मात केली असून त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. आता तो दुसर्या सराव सामन्यात भाग घेणार आहे.
इंग्लंड दौर्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघावर कोरोनाचे संकट ओढवले होते. स्टार फलंदाज ऋषभ पंत आणि सराव सहाय्यक दयानंद गरानी यांना कोरोनाची लागण झाली झाल्याने संघात चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे सावधगिरीची उपाययोजना म्हणून राखीव यष्टिरक्षक वृद्धिमान साहा, गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण आणि राखीव सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन यांना विलगीकरणाचे निर्देश देण्यात आले होते.
आता भारतीय संघात पंतचे पुनरागमन झाले असून पंतने कोरोनावर मात करून डरहॅम येथे भारतीय संघात प्रवेश केला आहे. बायो-बबलमधून 20 दिवसांचा ब्रेक मिळाल्यानंतर पंत कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळला होता आणि तो विलगिकरणात होता. भारताचा संघ सध्या कौंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यात खेळत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)ने आपल्या ट्विटर हँडलवर ऋषभ पंतचा फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत नमस्कार ऋषभ पंत तू परत आल्याने आनंद झाला, असे लिहिले आहे. 19 जुलै रोजी झालेल्या कोरोना टेस्टमध्ये पंत निगेटिव्ह आढळला होता. पंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळल्यानंतर संघात बरीच खळबळ उडाली होती तसेच भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकादेखील धोक्यात आली होती.
माध्यमांनुसार पंत कोविड लसीच्या दुसर्या डोसच्या आधी डेंटिस्टकडे गेला होता आणि तेथून त्याला लागण झाली तसेच पंत गेल्या महिन्यात युरो फुटबॉल सामन्याला हजर राहिला होता. याचे फोटोही त्याने सोशल मीडियावर टाकले होते. ताप आल्यामुळे पंतने कोरोनाची चाचणी केली. त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.
आता पंत 28 जुलैपासून होणार्या दुसर्या सराव सामन्यात खेळताना दिसणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर बीसीसीआयने बायो बबलमधून सर्व खेळाडूंना 20 दिवसांची रजा दिली होती. या दरम्यान सर्व खेळाडू इंग्लंडमध्ये खूप आनंद घेताना दिसत होते. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.