पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल परिसरात मागील काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दमदार एन्ट्री केलेली पहावयास मिळाली. रात्रीपासूनच पनवेल तालुका तसेच नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. शनिवारपासून सुरू झालेला पाऊस रविवारीही (दि. 18) धो-धो कोसळत होता.
नवी मुंबई, पनवेल परिसरात सलग दुसर्या दिवशीही पावसाने दमदार हजेरी लावली. गेले दोन दिवस पाऊस अहोरात्र कोसळत आहे. अचानकपणे व जोरात पडत असलेल्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडवलेली पहायला मिळाली. नवी मुंबई व पनवेलमध्ये सलग पडणार्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांनी घरीच थांबणे पसंत केले.
नवी मुंबईत शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे एका ठिकाणी भिंत कोसळली, तर नऊ ठिकाणी सखल भागात पाणी साचले. नवी मुंबई शहरात सरासरी 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नवी मुंबईत शनिवारी रात्री नऊ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रविवारपर्यंत पाऊस सुरू होता. शहरात एका ठिकाणी भिंत कोसळली. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती प्रशासनाने दिली तसेच पाच ठिकाणी झाडे कोसळली. नऊ जागी ठिकाणी सखल भागात पाणी साचले. एक शॉर्टसर्किटची घटना घडली.
नवी मुंबई शहरात 198.88 मिमी पावसाची 12 तासांत नोंद झाली आहे. एकूण 1451.44 मिमी पावसाची नोंद झाली. मोरबे धरण क्षेत्रात 167.80 मिमी तर एकूण 1481.90 मिमी पावसाची नोंद झाली.
मोरबे धरणाची पातळी 76.84 मीटरपर्यंत पोहचली आहे. शहरात सर्वाधिक पाऊस कोपरखैरणे विभागात 211.50 मिमी, बेलापूर विभागात 201.20, नेरूळ 197.20, वाशी 193.90 तर ऐरोलीत 190.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गटाराच्या जाळीत अडकला महिलेचा पाय
नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरातील सेक्टर 8 येथील फेरीवर भाजीचा व्यवसाय करणारे दोघे पती-पत्नी रात्री 8 वाजता भाजी विकण्यासाठी पायी चालत असताना यातील महिलेचा पाय अचानक गटाराच्या लोखंडी जाळीमध्ये अडकला. हा प्रकार पाहून त्या ठिकाणी रहिवाशांची गर्दी झाली, तर ऐकताच स्थानिक नागरिकांनीही धाव घेतली व त्या महिलेला धीर दिला. या वेळी तातडीने वेल्डिंग वर्कर्सला बोलून त्या गटाराचे झाकण कटरने कापण्यात आले. अर्ध्या तासाने महिलेचा पाय सुखरूप बाहेर काढण्यात आला व त्या गटाराच्या झकणाला पुन्हा वेल्डिंग करून ते झाकण नीट बसवले गेले.