Monday , January 30 2023
Breaking News

पालीची नळपाणीपुरवठा योजना अडकली लालफितीत

दुषित पाण्याचा पुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील पाली गावाची सुमारे 12 कोटींची शुद्ध नळपाणीपूरवठा योजना लालफितीत अडकून पडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

पाली शहराला अंबा नदिचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पुरविले जाते. तब्बल 15 हजारांहून अधिक लोक या पाण्यावर अवलंबून आहेत. पालीकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे, अंबा नदीचे पाणी सांडपाणी, शेवाळ व केमिकलमुळे प्रदूषित झाले आहे. शोकांतिका म्हणजे पाली शुद्ध नळपाणी पुरवठा योजना  प्रलंबित आहे. सद्यस्थितीत तब्बल 12 कोटींची शुद्ध नळपाणी योजना लालफितीत अडकली आहे. ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता देखील आहे.

अंबा नदीच्या पाण्यात पावसाळ्यात गाळ व चिखलाचे प्रमाण अधिक असते. तर नंतर मोठ्या प्रमाणात हिरवळ व शेवाळ असते. साप, मासे, शिंपले नळाद्वारे थेट येतात तसेच नाले व गटारांमधील प्रदुषित सांडपाणी, रासायनिक कंपन्यांमधील टाकऊ रसायन हे आंबा नदीत सोडले जाते. या बरोबरच कचरा आणि घाणदेखील साठते. नदीवर महिला कपडे व भांडी धुतात तसेच नदीत निर्माल्य देखील टाकले जाते. यामुळे अंबा नदीचे पाणी प्रचंड प्रमाणात प्रदूषित व खराब होते. या सर्वांमुळे पाण्याला उग्र स्वरुपाची दुर्गंध येते, चवही खराब लागते. असे पाणी प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी बहुसंख्य नागरिक अधिकचे पैसे खर्च करुन पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा आधार घेत आहेत.

पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणार्‍या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण सात कोटी 79 लाखांचा निधी व 10 टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती, परंतू ही योजना रखडली गेली. त्याबरोबर 10 टक्के लोकवर्गणीचा प्रश्नदेखील होता, मात्र पालीला ’ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे तसेच शुद्ध नळपाणीपुरवठा योजनेसाठी 11 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. लोकवर्गणीची अट शिथील करण्यात आली आहे, पण अजुनही ही योजना कार्यान्वित होऊ शकलेली नाही.

अंबा नदी सुधागड वासीयांची जीवनदायिनी आहे. अंबा नदीचे पाणी खराब असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्रलंबित नळपाणी योजना लवकर कार्यान्वित करावी.

-नोएल चिंचोलकर, ग्रामस्थ

 वारंवार पाणी टंचाईचे सावट

अंबा नदीजवळील जॅकवेलमध्ये असलेल्या पंपांद्वारे पाणी सरगडाच्या पायथ्याशी असलेल्या चार साठवण टाक्यांमध्ये सोडले जाते व तेथून सर्व पालीत पाणीपुरवठा केला जातो. तर काही भागात नदीतून थेट पाणी पुरवठा केला जातो, मात्र जॅकवेल ते साठवण टक्या यांच्या दरम्यानचे मोठे अंतर, वाहिन्यांचा छोटा आकार, वारंवार फुटणार्‍या लहान, जुन्या व जिर्ण झालेल्या जलवाहिन्या, साठवण टाक्यांची दुरवस्था, सतत बिघडणारे व अपुर्या क्षमतेचे पंप, जॅकवेलमध्ये गाळ साठणे, जुने वॉल फुटणे, मुख्य जल वाहिनीला जोडलेल्या इतर वाहिन्या, वारंवार खंडित होणारा विज पुरवठा व अपुरे कर्मचारी अशा असंख्य कारणांमुळे पालीत नेहमी पाणी टंचाई भेडसावते.

 आमदार रविशेठ पाटील यांचा समस्या   सोडविण्यासाठी पुढाकार

नळपाणी योजना झाल्यास ही समस्या निकाली निघू शकते. आमदार रविशेठ पाटील हेदेखील पालीतील पाणी प्रश्नावर संबंधित अधिकारी वर्गाची बैठक घेऊन पालिकर जनतेला शुद्ध पाणी जलद गतीने कसे मिळेल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.  दरम्यान ही योजना जुनी आहे. नगरपंचायत प्रशासक म्हणून ही योजना अंमलात आणण्यासाठी स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. याकामी आम्ही सर्वोतोपरी सहकार्य करू, असे दिलीप रायण्णावार, प्रशासक, नगरपंचायत पाली यांनी सांगितले.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply