खोपोली : प्रतिनिधी
कोप्रान कंपनीमधील दीपाली लोणकर यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून तडकाफडकी कमी केले आहे. न्याय मिळावा म्हणून त्यांनी खालापूर तहसील कार्यालयासमोर रविवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक व कामगार आयुक्तांची चर्चा केली असून, लवकर दीपालीला न्याय मिळवून देऊ, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी बुधवारी (दि. 27) येथे केले.
खालापूर तालुक्यातील कोप्रान लिमिटेड या औषध निर्माण करणार्या कारखान्यातील गुणवत्ता मापन विभागात काम करणार्या दीपाली लोणकर यांना कंपनी व्यवस्थापनाने 25नोव्हेंबर रोजी तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आल्याची नोटीस दिली. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा, यासाठी दीपाली लोणकर यांनी खालापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून, सन्मानाने कामावर घेतल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
दरम्यान, चित्राताई वाघ यांनी बुधवारी खालापूर येथे येवून उपोषणकर्त्या दीपाली लोणकर यांची भेट घेतली व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत चित्राताई वाघ यांनी या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मी सर्व प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली.
या वेळी भाजप उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, शशिकांत मोरे, राकेश गव्हाणकर, विकास रसाळ आदी उपस्थित होते.