पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 20) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या वेळी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. या सभेला आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर जगदिश गायकवाड आदी उपस्थित होते.
कोविड-19 या संसर्गजन्य रोगाने बाधित रुग्णांवर उपचारासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथील विलगीकरण कक्ष, इंडिया बुल्स् येथील विलगीकरण केंद्र आणि जम्बो कोविड सेंटर येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना अल्पोपहार पुरविण्यासाठी 16 एप्रिल 2020पासून 25 एप्रिल 2021पर्यंत (12 महिने 48 दिवसांकरिता) दोन कोटी 67 लाख 39 हजार 985 रुपये खर्च झाल्याची माहिती देण्यात आली. त्या पुढील कालावधीसाठी लागणार्या खर्चाला या सभेत मान्यता देण्यात आली.
महापालिका हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया करणेकामी शासनाकडून खानाव येथील गट क्र.83 ‘अ’ची जागा मिळण्याबाबत व शासन निर्देशाप्रमाणे विकसित करणे या विषयावर चर्चा करून हा विषयही मंजूर करण्यात आला. प्रश्नोत्तरांच्या वेळी ई-टॉयलेटचे काम वेळेत पूर्ण न झाल्याबद्दल सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली व खांदा कॉलनीत फूटपाथवर सुरू करण्यात आलेल्या वाचनालयाबाबत एकनाथ गायकवाड यांनी विचारलेल्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली.
दरम्यान, पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा एकदा रूजू झाल्याबद्दल गणेश देशमुख यांचा महासभेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच सचिव तिलकराज खापर्डे हे निवृत्त होत असल्याने त्यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …