Breaking News

गोवठणे ग्रामपंचायती अजब कारभार

निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वीच पाइपलाइनचे काम पूर्ण; आमदार महेश बालदींची पं.स.कडे चौकशीची मागणी

उरण : वार्ताहर

वरातीमागून घोडे हि म्हण तुम्ही ऐकली असेलच. असा काहीसा प्रकार गोवठणे ग्रामपंचायतमध्ये घडला आहे. शासकीय काम म्हटले की निविदानंतर मंजुरी आणि शेवटी अमंलबजावणी अशी प्रक्रिया असते, पण उरण तालुक्यातील गोवठणे ग्रामंपचायतमध्ये मात्र आधी काम नंतर निविदा असा अजब प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायतीच्या या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी उरण पंचायत समितीकडे केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, 15 व्या वित्त आयोगानुसार गोवठणे ग्रामपंचायतीत रामेश्वर म्हात्रे यांचे घर ते स्मशानभूमी आणि धनाजी वर्तक ते राजेंद्र म्हात्रे यांच्या घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे अशी 310000  ची प्रस्तावित कामे होती. या कामाबाबत ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या स्वाक्षरीने वृत्तपत्रात जाहिरातदेखील दिली होती. जाहिरातीनुसार कामाची निविदा भरण्याची अंतिम दिनांक 22 जुलै 2021 होती, पण निविदा दाखल दिनांकाआधीच, निविदा प्रसिद्ध होण्याआधीच या पाइपलाइनचे काम पूर्णत्वास गेले आहे. निविदा न घेताच काम मंजूर करून पूर्णत्वास गेले. त्यामुळे या प्रकरणाला भ्रष्टाचाराचा वास येत आहे.

शासकीय नियमानुसार निविदा मागवून आणि त्यातील योग्य व उत्कृष्ट कामाची हमी देणार्‍या निविदेला मंजुरी देऊन काम केले जाते, मात्र इथे पूर्णपणे शासकीय नियमाला हडताल फासला आहे.कोणतीही शासकीय प्रक्रिया न राबवता काम देऊन ते नित्कृष्ट दर्जाने पूर्ण केले आहे. या कामासाठी वापरण्यात आलेले पाइप हे कमकुवत आहेतच. सोबतच शासकीय नियमानुसार खोलवर पाइपलाइन टाकायचे सोडून उघड्यावर पाईप्स टाकण्यात आले आहेत. यामुळे भविष्यात वाहनांचा घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. या कामांबाबत काही प्रश्न उपस्थित राहतात की निविदा न घेता काम कसे सुरू झाले ? ग्रामसेवक व सरपंचांनी यांस मंजुरी कशी दिली? ठेकेदारास किती रक्कम अदा झाली आहे? कामाच्या साहित्याचा दर्जा कोणी ठरवला? असे असंख्य प्रश्न ग्रामस्थांना पडले आहेत. त्यामुळे कुठेतरी भ्रष्टाचार झाला असल्याची कुजबुज ग्रामस्थांमध्ये आहे. या प्रकरणाची प्रशासन दखल घेऊन संबधितांवर योग्य कारवाई करावी, अशी  ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच आमदार महेश बालदी यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी उरण पंचायत समितीकडे केली आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply