पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे गावात गुरुवारी रात्री दरड कोसळल्यानंतर पाच जणांचा दरडीखाली मृत्यू झाला. यापैकी कीर्तनकार गेनूबुवा दाभेकर यांचा पुतण्या आणि त्याची पत्नी या दोघांनी गावात नवीन घर बांधून श्रावण महिन्यात गृहप्रवेश करण्याचे ठरविले होते, मात्र घराला रंग लावण्याआधीच दरडीखाली त्यांचे अस्तित्व संपले.
मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या सुनील केशव दाभेकर (वय 30) याने कुटुंबीयांसाठी गावात नवीन घर बांधून येत्या श्रावण महिन्यात गृहप्रवेश करण्याचे ठरविले होते. त्याची पत्नी शिल्पा हीदेखील त्याच्या प्रयत्नांना साथ देत होती. एकमजली टुमदार घर केवळ लॉकडाऊन काळात बांधून तयार झाले. आतील विविध कामांत दोघे लक्ष देत कडेच्या जुन्या घरात राहत होते.
गुरुवारी ज्येष्ठ कीर्तनकार गेनूबुवा दाभेकर यांनी पुतण्या सुनील आणि त्याची पत्नी शिल्पा या दोघांना रात्री जेवायला बोलावले. या वेळी देवळे गावातील नाभिक समाजाचे कारागिर महादेव रामजी कदम हे उशीर झाल्याने जेवायला थांबले. तेवढ्यात, मोठ्या आवाजासह डोंगर कोसळला. काहींनी गेनूबुवा यांना आवाज देऊन बाहेर पडायला सांगितले. तोंडातील घास बाहेर कसा काढू, श्रीपांडुरंग पाठिराखा आहे, असे सांगत असतानाच मोठ्या दरडींचा लोळ घरांवर कोसळला. गेनूबुवा यांना त्यांची पत्नी इंद्राबाई, तसेच पुतण्या सुनील आणि शिल्पा यांच्यासह जिवंत समाधी मिळाली.