Breaking News

ऑलिम्पिक खेळाडूंना भारत सरकारचा दिलासा; भारतात येताना कोरोना चाचणीतून सूट

टोकियो : वृत्तसंस्था

टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार्‍या भारतीय खेळाडू, अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जपानची राजधानी असलेल्या टोकियोमधून बाहेर पडण्यापूर्वी खेळाडूंना कोरोना आरटी-पीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल दाखविण्याची आवश्यकता नाही, असे सरकारने सांगितले आहे. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी अधिकृत पत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली. यापूर्वी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सरकारला विनंती केली होती की, ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या पथकाचे लसीकरण करण्यात आले आहे आणि टोकियोमध्ये नियमित कोरोना चाचणी घेण्यात येत आहेत. त्यामुळे या सर्वांना आरटी-पीसीआर चाचणी अहवाल दाखविण्यापासून सूट मिळावी, अशी विनंतीही बत्रा यांनी केली होती. आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी पुढे म्हणाले की, ‘केवळ त्याच व्यक्तींना विमानात चढण्याची परवानगी देण्यात यावी, ज्यांची कोरोना चाचणी नकारात्मक आहे. ज्यांना कोणत्याही आजाराची लक्षणे नाहीत, त्यांना प्रवेश दिला जावा, तसेच टोकियोहून भारतात आलेल्या सर्वांची पुन्हा चाचणी केली जाईल आणि 14 दिवसांसाठी स्वतः आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या अटीवरच त्यांना विमानतळावरून सोडण्यात येईल.’ क्रीडा सचिव रवी मित्तल यांना लिहिलेल्या पत्रात बत्रा यांनी म्हटले आहे की, परदेशातून भारतात येणार्‍यांना आरटी-पीसीआर चाचणी अहवाल दाखविणे आवश्यक आहे. हे जपानहून आलेल्या लोकांनाही लागू होते. फक्त टोकियोहून परत येणारे खेळाडू, अधिकारी, आयओए प्रतिनिधी, एनएसएफ अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी यांना यातून सूट मिळावी.  स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर खेळाडूंना 48 तासांच्या आत टोकियो सोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. भारतीय संघाला कोरोना चाचणीशिवाय टोकियोमधून सोडण्याची परवानगी देण्याची विनंती भारत सरकारने जपान सरकारला करावी, अशी विनंती बत्रा यांनी केली. रौप्यपदक विजेती मीराबाई चानूसह वेटलिफ्टिंगचे खेळाडू सोमवारी भारतात दाखल झाले. जपानमधून एअर इंडिया, विस्तारा, ऑल निप्पॉन एअरलाइन्स आणि जपान एअरलाइन्सची उड्डाणे होणार आहेत. या सर्व विमान कंपन्यांनीही आरटी-पीसीआर अहवालाशिवाय भारतीय खेळाडूंना प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीही बत्रा यांनी केली होती.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply