Breaking News

महाडकरांसाठी भाजपचा मदतीचा हात; नागरिकांना दररोज भोजन, बिस्किटे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यातील महाडच्या तळीयेत महापूर आणि दरड कोसळल्याने मोठी हानी झाली. येथील नागरिकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आस्मानी संकटातून सावरण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाडकरांना मदतीचा हात देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नुकसानग्रस्त नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. गुरुवारी (दि. 22) तळीये गावात दुर्दैवी घटना घडल्याचे समजताच त्याच दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे घटनास्थळी रवाना झाले. प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी आला नव्हता, त्यापूर्वीच ही भाजपची नेतेमंडळी मदतीसाठी धावून आली, मात्र रिस्क्यू ऑपरेशन टीमने त्यांना त्या ठिकाणी जावू दिले नाही. त्यामुळे तेथेच तळ ठोकत शुक्रवारी सकाळी ही मंडळी, तसेच आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पदाधिकारी तळीये येथे नागरिकांच्या मदतीसाठी दाखल झाले. या सर्वांनी तळीये गावाची पाहणी करताना ग्रामस्थांना धीर दिला. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तळीये गावाला रविवारी भेट देऊन ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला, तसेच केंद्रामार्फत पुनर्वसन व इतर आवश्यक मदत करण्याचे त्यांना आश्वासित केले. माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही चिपळूण, खेड येथे पूरग्रस्तांची भेट घेत महाडलाही भेट दिली व तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना सावरण्याची हिंमत दिली. रायगड जिल्ह्यात बुधवारपासून जणू ढगफुटीच सुरू झाली आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले. महाडमध्ये महापूर आणि दरड कोसळून मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली. या आस्मानी संकटात सावरण्यासाठी वेळ लागणार असला, तरी सध्या त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न लक्षात घेता रायगड व ठाणे जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी महाडकरांसाठी मदतीचा हात दिला आहे. गुरुवारी झालेल्या महापूर व दरड कोसळण्याच्या घटनेने महाडकरांवर मोठे संकट आले. या परिस्थितीमुळे नागरिकांना भोजनाची व्यवस्थाही नव्हती. त्यामुळे भाजपच्या पदाधिकार्‍यांनी तातडीने अन्नधान्य जमा करून घेत हिरवळ प्रतिष्ठानच्या महाविद्यालयात पूरग्रस्तांसाठी भोजनाची व्यवस्था केली. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ तांदूळ, डाळ आदी भोजन साहित्याची व्यवस्था या ठिकाणी करून दिली. त्या अनुषंगाने शनिवारपासून दररोज सहा हजार महाडकर नागरिकांची भोजन व्यवस्था करण्यात आली असून, बिस्किटे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्यावर भोजन तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांची टीम तसेच दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष राजेश मपारा, सरचिटणीस मिलिंद पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, नाना महाले, बिपीन म्हामुणकर महाडमध्ये ठाण मांडून असून, त्यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते गरजूंना भोजन, पाणी व इतर मदत पोहचवत आहेत.

पूरग्रस्तांना मदत करा -आमदार प्रशांत ठाकूर

अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे महाड, तसेच अजूबाजूच्या परिसरामध्ये मोठे संकट उद्भवले आहे. पुराचे पाणी शिरून अतोनात नुकसान झाले आहे. सर्व काही भिजून, वाहून गेले असल्याने दोन वेळची भूक कशी भागवावी याही विवंचनेत पूरग्रस्त आहेत. या अशा कठीण परिस्थितीमध्ये महाड पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर धावले असून, त्यांनी नागरिकांनाही पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन केले आहे.

‘टीआयपीएल’ही सरसावले

महाडमध्ये पूर आणि दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखलमय परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्याचा उपसा करण्यासाठी ठाकूर इंफ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (टीआयपीएल) कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वीच यंत्रसामग्री कार्यान्वित करण्यात आली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सूचनेनुसार ठाकूर इंफ्राप्रोजेक्ट कंपनी अर्थात टीआयपीएलच्या माध्यमातून महाड येथे तीन जेसीबी, दोन डंपर, चार टँकर आदी यंत्रसामग्री व मनुष्यबळ कार्यान्वित करण्यात आले आहे. महापूर, दरड कोसळल्याने महाडमध्ये जीवित व वित्तहानी झाली. पूर ओसरल्यानंतरही महाडची अवस्था बिकट आहे. या ठिकाणी दरड, चिखलाचे साम्राज्य झाल्याने ते दूर करण्यासाठी ‘टीआयपीएल’च्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत मनुष्यबळ व यंत्रसामग्री तत्परतेने कार्यरत करण्यात आली आहे.

बेपत्ता 31 जण मृत गृहित तळीयेत प्रशासनाने शोधकार्य थांबवले

महाड, अलिबाग : प्रतिनिधी

महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावातील शोध व बचाव मोहीम सोमवारी (दि. 25) प्रशासनाने थांबवली. या गावात दरडीखालून आतापर्यंत 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, उर्वरित 31 जण बेपत्ता असल्याने त्यांना मृत गृहित धरण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा प्रशासन शासनाकडे पाठविणार असून शासन बेपत्ता 31 जण मृत असल्याचे शिक्कामोर्तब करणार असल्याचे समजते. दरडीखालून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले. 31 बेपत्ता आहेत. बेपत्ता 31 जाणांना मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे तळीये येथील मृतांची संख्या 84 झाली आहे. तळीये तसेच पोलादूर तालुक्यातील केळवणे येथे दरड कोसळून पाच, तर सुतारवाडी येथे कोसळलेल्या दरडीत सहा जणांचा मृत्यू झाला. महाड तालुक्यातील तळीये, पोलादपूर तालुक्यातील केळवणे व सुतारवाडी अशा तीन ठिकाणी कोसळलेल्या दरडीत एकूण 95 जणांचा मृत्यू झाला आहे. तळीये येथे सहा, केळवणे येथे सहा व सुतारवडी येथे 16 असे एकूण 28 जण जखमी झाले आहेत. जिल्हा प्रशासन यासंदर्भातील प्रस्ताव पुढे पाठवणार आहेत.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply