Breaking News

पूरग्रस्त महाडमध्ये साथरोगांचे संकट; लेप्टो, कोरोना, डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क

अलिबाग ः प्रतिनिधी

पूरग्रस्त महाडमध्ये आता नवे संकट उभे ठाकले आहे. पुरानंतर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये 19 जणांना लेप्टो स्पायरेसीस, तर तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचबराबेर डेंग्यू आणि मलेरियाचे प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. ही संख्या वाढण्याची भीती असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.  महाड आणि पोलादपूर तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला. पूर ओसरल्यानंतर महाडमध्ये चिखल तसेच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात गाळही साचला आहे. पुरामुळे अनेकांच्या वस्तू भिजल्या. धान्य कुजले. शेकडो जनावरेही मृत होऊन पडली होती. त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत महाडमध्ये 11 ठिकाणी, तर पोलादपुरात दोन ठिकाणी आरोग्य तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया, लेप्टो स्पायरेसीस, काविळ आणि कोरोना तसेच इतर जलजन्य आजारांची तपासणी केली जात आहे. यासाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पुणे महानगरपालिकांची आणि रायगड जिल्ह्याची आरोग्य पथके काम करीत आहेत. या तपासणीत महाडमध्ये आतापर्यंत लेप्टोचे 19, कोरोनाचे तीन, तर डेंग्यू आणि मलेरियाचे प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.पूरग्रस्त भागात नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. हे पंचनामे करणार्‍या पथकांसोबत ओआरएसची तीन पाकिटे आणि डॉक्सिसायक्लीन दोन गोळ्यांचे वाटप केले जात आहे. जखम झालेल्या नागरिकांसाठी टिटॅनसच्या लसीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विविध प्रकारची औषधे महाड आणि पोलादपुरातील रुग्णालयांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कोरोना चाचणीसाठी 25 हजार अँटीजेन कीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत, मात्र कोरोना रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाईल या भीतीने अनेक नागरिक तपासणीसाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. घरांच्या साफसफाईचे काम आणि दुरुस्तीचे काम यामुळे रखडेल, अशी भीती त्यांना वाटते आहे, पण नागरिकांनी आरोग्य तपासणीसाठी पुढे यावे. त्यांच्यावर गृहविलगीकरणातच उपचार केले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहे. दरम्यान, महाडमधील अनेकांच्या घरातील चिखल-गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी विविध कंपन्या, सामाजिक संस्था-संघटनांनी पुढाकार घेतला आहे. शिवाय शहरात सेवाभावी संस्थांनी साफसफाई मोहीम हाती घेतली आहे. शासन-प्रशासनानेही मोठ्या प्रमाणावर यंत्रणा उभारून गाळ, कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

संस्थात्मक विलगीकरणाच्या भीतीमुळे नागरिक कोरोना चाचणीसाठी येत नाहीत, परंतु नागरिकांनी निसंकोचपणे आरोग्य तपासणी करून घ्यावी. कोरोना रुग्णावर गृहविलगीकरणातच उपचार केले जातील. सर्व प्रकारची औषधे घरीच उपलब्ध करून दिली जातील. जनतेने वेळेत उपचार करून घ्यावेत.

-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply