Tuesday , February 7 2023

पुढील दोन महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस

मुंबई ः प्रतिनिधी

ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून महासंचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांनी पत्रकार परिषद घेत हा अंदाज वर्तविलाय. ऑगस्ट महिना पाहता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस दिसून येतो, मात्र यंदा राज्यासह देशात पुढील दोन महिन्यांचा विचार केला तर पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहिल, असे मोहोपात्रा म्हणाले. जुलै महिन्यात हवामान विभागाकडून दुसर्‍या पंधरवाड्यात मोठा पाऊस होईल अशा अंदाज दुसर्‍या मॉडेलच्या माध्यमातून वर्तवण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरला. भारतीय हवामान विभागाकडून हा एक नवा प्रयोग केला जात आहे, ज्यात दर महिन्यातील पावसाचा अंदाज वर्तवला जातो. या वर्षी हा पहिलाच प्रयोग आहे. ऑगस्ट महिन्याचा अंदाज पाहिला तर कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, तर काही ठिकाणी सरासरीइतक्या पावसाची नोंद होईल, मात्र मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा तसेच विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीतदेखील सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या उत्तरार्धात ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे, तर पूर्व विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोलीतील काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply