पनवेल पालिका आयुक्तांचे अधिकार्यांना आवाहन
पनवेल : प्रतिनिधी
महापालिकेच्या विविध विभागातील कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि .2) झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिकार्यांनी स्वत:ची व स्वत:च्या परिवाराची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
महापौर बंगल्याचे बांधकामाचे काम हाती घेण्याच्या दृष्टीने अंदाजपत्रक तयार करणे, होल्डींग पॉन्डमधील गाळ काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना बांधकाम विभागास दिल्या. महिला बालकल्याण विभागाच्यावतीने ‘शी’ टॉयलेटस् बांधण्यासाठी एस.टी. महामंडळाकडे पत्र व्यवहार करणे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या गाईड लाईन्सप्रमाणे स्वातंत्र दिन साजरा करताना विद्युत रोषणाई, मंडप तसेच वृक्षारोपण, ऑनलाईन आंतरशालेय प्रश्नमंजूषा, वादविवाद स्पर्धा, देश भक्तीपर गाण्यांच्या स्पर्धा घेण्यासाठी संबधित विभागास सूचना देण्यात आल्या.
अनधिकृत दिव्यांगाच्या टपार्या काढणे तसेच पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली गोदामे, टपर्या, शेड यांच्याविरोधात धडक मोहीम राबविण्याच्या सूचना उपायुक्त आणि सर्व प्रभाग अधिकारी देण्यात आल्या. संभाव्य कोरोनाची तिसरी लाट ही जास्त धोकादायक असणार आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर अधिकार्यांनी काळजी घेणे महत्वाचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच या दृष्टीने कळंबोली येथील भारतीय कापूस निगम येथील जंबो कोविड सेंटरचे काम लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्याच्या सूचना आयुक्तांनी वैद्यकिय आरोग्य विभागास दिल्या.